मुंबई मेट्रोच्या कामाचा मंत्रालायाला फटका,  काम सुरु असताना कार्यालयाच्या काचा फुटल्या

या घटनेचे फोटो सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाले आहेत. 

    मुंबई मेट्रो : सध्या मुंबई मेट्रोचे काम जोरदार सुरु आहे. याचदरम्यान मुंबई मेट्रोचे काम सुरू असताना दगड फोडण्यासाठी करण्यात आलेल्या स्फोटकाचा फटका मंत्रालयाला सुद्धा पडला आहे. मुंबई मेट्रोचे काम सुरू असताना काही दगडांमुळे मंत्रालयाच्या कार्यालयाच्या काचा फुटल्या. त्या कामामुळे मंत्रालयाच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
    भूमिगत मेट्रो लाईन ३ च्या संदर्भात काही ब्लास्टिंग कामामुळे गुरुवारी दक्षिण मुंबईतील मंत्रालयाच्या (महाराष्ट्र राज्य सचिवालय) खिडकीवर आणि विस्तीर्ण संकुलाच्या आवारात उभ्या असलेल्या काही वाहनांवर दगड आदळले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाले आहेत.
    बोगद्याच्या कामाचा एक स्फोट, पार्क केलेल्या वाहनांवर तसेच राज्यमंत्र्यांच्या केबिनच्या खिडकीवर दगड आदळला, असे ते म्हणाले. दक्षिण मुंबईतील कुलाबा ते अंधेरीतील आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत भूमिगत मेट्रो मार्ग बांधला जात असून त्यात वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि SEEPZ यांचा समावेश असेल.

    मंत्रालय परिसरात मोठमोठ्या मंत्र्यांच्या गाड्या पार्किंगमध्ये उभ्या असतात. अतिशय सुरक्षेचा हा परिसर आहे. मंत्र्यांची सुरक्षा फार महत्त्वाची मानली जाते. असं असताना या अशाप्रकारच्या स्फोट घडवून आणताना सुरक्षेची काळजी घेणं जास्त अपेक्षित असतं. त्यामुळे यामध्ये दुर्लक्ष करण्यात आलंय का? याची चौकशी होणं जास्त गरजेचं असणार आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात अशाप्रकारचे सुरुंग लावले जात आहेत.