राज्यातील ‘या’ जिल्ह्यात शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या, घरात घुसून चाकूने सपासप वार

    भंडारा : नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या हत्येची घटना ताजी असतानाच भंडाऱ्यात शिवसेना पदाधिकाऱ्याचाही खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भंडारा तालुक्यातील दवडीपार बेला येथील उपसरपंचांची चाकूने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा आरोप केला जात आहे.

    नेमकं काय आहे प्रकरण?

    घराशेजारी असलेल्या लोकांसोबत आरोपीचे जुने भांडण होते. शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास या भांडणाचा वचपा काढण्यासाठी आरोपी हे दवडीपार बेला येथील उपसरपंच दिनेश बांते यांच्या घरी गेले. घरी जाऊन त्यांनी बांते यांच्या शरीरावर चाकूने वार केला. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले.

    दरम्यान दिनेश बांते यांना रुग्णवाहिकेतून भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती भंडारा शहर पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा शोध सुरु केला आहे.

    दिनेश बांते कोण आहेत?

    दिनेश बांते हे भंडारा तालुक्यातील दवडीपार बेला येथील उपसरपंच होते. त्याचप्रमाणे ते शिवसेनेचे विभाग प्रमुख म्हणूनही कार्यरत होते. घरात घुसून शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बांते यांची हत्या करणाऱ्या आरोपींचा तपास पोलीस करत आहेत.