प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट एकने धडाकेबाज कारवाई करत वडगाव मावळमधील सागर इंद्रा टोळीतील सदस्य विश्वजित देशमुख याच्या खुनाचे गूढ उकलले.

    पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट एकने धडाकेबाज कारवाई करत वडगाव मावळमधील सागर इंद्रा टोळीतील सदस्य विश्वजित देशमुख याच्या खुनाचे गूढ उकलले. पान टपरीवर झालेल्या भांडणाच्या रागातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी या प्रकरणी दोघांना आकुर्डी येथून अटक केली आहे. राम जाधव (वय 22, रा आकुर्डी) व आदित्य उर्फ सोन्या सुरिंदर चौहान (वय 22, काळेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

    पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा, युनिट 1 चे पोलीस पथक युनिटच्या हद्दीत फरार आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार महादेव जावळे व बाळू कोकाटे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, काळेवाडी परिसरात राहणारे आदित्य चौहान व राम जाधव हे काळेवाडी चौकात असताना त्यांनी तळेगाव किंवा वडगाव मावळ परिसरात कोठेतरी कोणाचा तरी गेम केला असल्याबाबत चर्चा करत होते. त्याबाबत माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी युनिट 1 कडील स्टाफची दोन पथकॆ तयार करून त्यांना योग्य त्या सूचना व मार्गदर्शन करून पथकसह स्वतः काळेवाडी, राहटणी, आकुर्डी या परिसरात जाऊन संशयित इसमांचा शोध घेतला.

    आकुर्डी येथील जय गणेश व्हिजन, आयनॉक्स थिएटरच्या पार्किंगमध्ये दोघे आरोपी त्यांच्या मित्रासोबत आढळून आले. त्यांना पकडण्यासाठी जाणारे पोलिस पथक पाहून ते पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने पकडले.
    त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, सात जूनला ते व त्यांचे इतर 6 मित्र वडगांव मावळ येथे वाढदिवसाच्या पार्ट्यासाठी जात असताना मातोश्री हॉस्पिटलजवळ रोडच्या कडेला असलेल्या पान टपरीवर थांबलेल्या इसमांशी किरकोळ कारणावरून भांडण झाले. टपरी चालक व त्याच्या मित्रांनी त्यांना मारहाण केली होती. त्याचाच राग मनात धरून आरोपी व त्याचे सहा साथीदार यांनी 13 जूनला पुन्हा त्या पान टपरीजवळ गेले व त्यांना मारहाण करणाऱ्या माणसावर त्यांनी तलवार व कोयत्याने वर केले.

    याबाबत वडगाव मावळ पोलीस ठाण्याकडे खातराजमा करता कळले की, भा. द. वि कलम 302, 307, 143, 147, 148, 149 सह भारतीय शस्त्र अधिनियम 1962 चे कलम 4(25) अन्वये गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणात झालेल्या मारहाणीत विश्वजित देशमुख ( वय 22) हा मयत झाला. भांडणे सोडवण्यासाठी गेलेला त्याचा मित्र सागर इंद्रा यास गंभीर जखमी करून आरोपी पसार झाले. अखेर त्यांना शोधून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर तसेच पोलीस अंमलदार महादेव जावळे, बाळू कोकाटे, सोमनाथ बोऱ्हाडे, अमित खानविलकर, मनोजकुमार कमले, गणेश महाडिक, उमाकांत सरवदे, सचिन मोरे, प्रमोद हिराळकर, विशाल भोईर, मारुती जायभाय, प्रमोद गर्जे, स्वप्नील महाले यांच्या पथकाने केली.