नागपूर हवालाचे गुजरात कनेक्शन, 98 लाखांवर रक्कम जप्त, तपासात लागली ईडी, आयटी

हवाला व्यापारी आपला व्यवसाय कायदेशीर करण्यासाठी त्यांच्या खात्यात सोने, चांदी आणि हिऱ्यांची खरेदी दाखवतात. मात्र, प्रत्यक्षात ही सर्व बिले बोगस राहतात. विदेशी व्यापाऱ्यांकडून हिरे-सोने खरेदी केल्याचा दावा केला जातो.

  नागपूर (Nagpur) : लकडगंजमधील हवाला व्यापाराचे कनेक्शन गुजरातमध्ये असल्याचं स्पष्ट झालंय. आतापर्यंत 98.46 लाख रुपये रक्कम जप्त करण्यात आली. या तपासात आता ईडी, आयटी लागली आहे. त्यामुळं हवाला व्यापाऱ्यांत भीतीचं वातावरण आहे.

  पोलीस विभागाच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. 26 नोव्हेंबरला झोन तीनचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी हा सर्जिकल स्टॉईक केला. 11 जणांची चौकशी करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. भूतडा चेंबरसह तीन-चार खासगी लॉकर्सवर कारवाई करण्यात आली. व्यापाऱ्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत जाणून घेण्यासाठी तपास आयकर विभाग आणि ईडीकडं सोपविण्यात आलाय. सराफा बाजारातील बहुतांश व्यापारी सुरक्षेसाठी खासगी लॉकर्समध्ये दागिने, सोने ठेवतात. लग्नाचा सिझन असल्यानं व्यापाऱ्यांना वेळेवर डिलिव्हरी देण्याची चिंता सतावत आहे.

  नोटांच्या अनुक्रमांकावर चालतो खेळ
  हवालाद्वारे करोडोंची उधळपट्टी केली जाते. हा सगळा खेळ नोटांच्या अनुक्रमांकाच्या आधारे खेळला जातो. या व्यवसायात आयकरासह व्यापारी जीएसटीही वाचवतात. मुंबईपासून ते दिल्ली, चेन्नई, कलकत्ता, मद्रास, रायपूर, जबलपूर, नागपूर आणि देशातील सर्व मोठ्या शहरांमध्ये व्यापारी हवाला व्यापाऱ्यांच्या मदतीने पैसे पाठविले जातात. यासाठी शहराच्या अंतरानुसार 1 लाखावर जवळपास 400 ते 500 रुपये कमिशन लागते.

  जबलपूर पाठोपाठ नागपूर केंद्र
  गुजरातमधील सुरत, बडोदा आणि अहमदाबाद हे हवाला व्यापाऱ्यांचे मोठे केंद्र आहे. याआधी बहुतांश सराफा व्यावसायिकांचा यात सहभाग होता. मात्र हळूहळू औषध, वाहतूक, बिल्डर, बुकीही या व्यवसायात उतरले. त्यानंतर मोठ्या रकमेची उधळण करण्यासाठी नवनवीन युक्त्याही वापरल्या जातात. 2015 नंतर जबलपूरमध्येही अनेक व्यापाऱ्यांनी हवाला व्यवसायात उडी घेतली. जबलपूरनंतर आता नागपूर हे हवालाचे मोठे केंद्र बनले आहे.

  हवाला व्यापारी आपला व्यवसाय कायदेशीर करण्यासाठी त्यांच्या खात्यात सोने, चांदी आणि हिऱ्यांची खरेदी दाखवतात. मात्र, प्रत्यक्षात ही सर्व बिले बोगस राहतात. विदेशी व्यापाऱ्यांकडून हिरे-सोने खरेदी केल्याचा दावा केला जातो. या बिलांचा संदर्भ देऊन हे व्यावसायिक सुरत-मुंबईच्या बँकांमधून कोट्यवधी रुपये परदेशी बँकांमध्ये हस्तांतरित करतात. प्रत्यक्षात एकही हिरा किंवा सोन्याचा तुकडा भारतात येत नाही.