नागपूरकर गारठले; पारा १२.६ सेल्सियस वर

तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे आता डिसेंबरमध्ये पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीला लवकरच सुरुवात होणार असल्याचे संकेत मिळत आहे.

    नागपूर, वातावरणात बदल होण्यास सुरुवात झाली असून डिसेंबरमध्ये पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीची चाहुल लागली आहे. गुरुवारी नागपूर शहराची विदर्भात सर्वाधिक थंड शहर म्हणून नोंद झाली. ढगाळ वातावरण निवळताच कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा खाली आहे. डिसेंबर महिन्यात पहिल्यांदाच किमान तापमान 12.4 डिग्रीवर आले.

    तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे आता डिसेंबरमध्ये पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीला लवकरच सुरुवात होणार असल्याचे संकेत मिळत आहे. सध्या सायंकाळपासून सकाळपर्यँत बोचरी थंडी जाणवत असून रात्री दवबिंदू पडत आहे.

    थंडीत वाढ झाल्यामुळे सकाळी व रात्री वॉकिंगला जाणाऱ्यांची संख्या ओसरल्याचे चित्र आहे. तसेच नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर करीत आहे. गुरुवारी शहराचे कमाल तापमान 28 डिग्री तर किमान तापमान 12.4 डिग्री नोंदविण्यात आले. हवामान विभागानुसार शनिवारपर्यंत पारा 9 डिग्रीपर्यंत घसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

    7 डिग्रीपर्यंत घसरणार पारा
    हवामान विभागानुसार आता ढगाळ वातावरण निवळले असून कोरडे व निरभ्र वातावरणामुळे तापमानात झपाट्याने घसरण होण्याची शक्यता आहे. डिसेंबरअखेर पारा 7 डिग्रीपर्यंत घसरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी नागपूरनंतर गोंदिया दुसऱ्या क्रमांकाचे थंड शहर म्हणून नोंद झाली. येथील किमान तापमान 12.5 डिग्री होते. वर्धा 12.9, अकोला 16.4, अमरावती 13.3, बुलडाणा 17.0, ब्रम्हपुरी 13.7, चंद्रपूर 14.0, गडचिरोली 13.4, वाशिम 16.0 व यवतमाळचे किमान तापमान 14.5 डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले.