नागपूर रेल्वे विभाग मालवाहतूक करून होत आहे ‘मालामाल’; रेल्वेला ४०५ कोटी ७८ लाख रुपयांचे उत्पन्न

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ८२१ मालगाडय़ांमधून वाहतूक झाली होती आणि रेल्वेला त्यातून २४४ कोटी ३५ लाख उत्पन्न मिळाले होते. यावर्षी नोव्हेंबरमध्ये ४०५ कोटी ७८ लाख रुपयांची कमाई झाली. नागपूर रेल्वेत आजवर सर्वाधिक मालवाहतूक मे २०२१ मध्ये झाली होती. त्यातून रेल्वेला ३८३ कोटी ६८ लाख रुपये मिळाले होते.

  नागपूर (Nagpur) : करोनामुळे आलेल्या मंदीतून देश सावरत असल्याचे दिसत असून त्याचा परिणाम रेल्वेच्या माल वाहतुकीवर झाला आहे. नागपूर विभागाने आजपर्यंत एका महिन्यात सर्वाधिक मालवाहतूक करण्याचा विक्रम नोंदवला. नोव्हेंबर महिन्यात एक हजार १७० मालगाडय़ांमधून वाहतूक करण्यात आली. त्यातून रेल्वेला ४०५ कोटी ७८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

  करोनामुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले होते. बांधकाम क्षेत्रावर परिणाम झाल्याने सिमेंट आणि इतर साहित्यांची मागणी घटली होती. परंतु आता करोनाचे रुग्ण कमी झाल्याने आणि सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. त्याचा परिणाम म्हणून की काय रेल्वेची मालवाहतूक वाढली आहे.

  गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ८२१ मालगाडय़ांमधून वाहतूक झाली होती आणि रेल्वेला त्यातून २४४ कोटी ३५ लाख उत्पन्न मिळाले होते. यावर्षी नोव्हेंबरमध्ये ४०५ कोटी ७८ लाख रुपयांची कमाई झाली. नागपूर रेल्वेत आजवर सर्वाधिक मालवाहतूक मे २०२१ मध्ये झाली होती. त्यातून रेल्वेला ३८३ कोटी ६८ लाख रुपये मिळाले होते.

  हिंगणघाट गुड्स शेड येथून सोयाबीनचे बियाणे वाहूतक करण्यात आली. पिंपळखुटी गुड्स शेड मधून कापसाची वाहतूक सुरु झाली. पाच मालगाडय़ामधून झालेल्या माल वाहतुकीतून ०.८९ कोटी रुपयांची कमाई रेल्वेला झाली.

  कोळसा वाहतूक वाढली
  एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यात नागपुरातून कोळसा वाहतूक वाढली. गेल्यावर्षी ४३३०.५ मालगाडय़ा (रेक) माल वाहतूक होती. ती वाढून ६२८३.५ मालगाडय़ांवर पोहचली. म्हणजेच १९५३ मालगाडय़ांमधून अधिक वाहतूक झाली. याशिवाय कापूस १३ मालगाडय़ा, पोलाद व स्लॅग ५० मालागाडय़ा, क्लिंकर ११४, डीओसी ५२, आयरन व स्टिलच्या ३८, सिमेंट १९९ , ट्रॅक्टर १२ फ्लाय अ‍ॅश पाच आणि डोलोमाइटच्या १५ मालगाडय़ा नागपूर विभागातून भरण्यात आल्या, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.