Nagpur Z P समिती सदस्य निवडीचा मुहूर्त ठरला, MLC निवडणुकीच्या मतदानानंतर होणार निवड

नागपूर विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजारामध्ये आपले मतदार फुटू नये, यासाठी भाजपनं रणनीती आखली आहे. नागपूर महापालिकेतील नगरसेवक सहलीला रवाना केले. रविवारी रात्री 26 नगरसेवक गोव्यासाठी रात्री 1 वाजताच्या फ्लाईटन रवाना झाले.

    नागपूर (Nagpur) : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनिमित्त नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य सहलीला परराज्यात गेले आहेत. 12 नोव्हेंबरला उपाध्यक्षपदाची माळ सुमित्रा कुंभारे यांच्या गळ्यात पडली. आता 16 सदस्यांना दहा विषय समित्यांवर नियुक्त्या द्यायच्या आहे. परंतु, जिल्हा परिषद सदस्य परराज्यात गेल्यानं आता विधान परिषद निवडणुकीच्या मतदानानंतरच जिल्हा परिषदेच्या समिती सदस्य निवडीचा मुहूर्त निघणार आहे.

    यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेवर विधान परिषदेच्या आचारसंहितेचे सावट होते. त्यामुळं समिती सदस्यांची निवड लांबणीवर पडली होती. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने समितीवर सदस्यांच्या निवडीसंदर्भात मार्गदर्शन मागितले होते. त्यांच्याकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार समितीवर सदस्यांच्या निवडीकरिता 13 डिसेंबर रोजी जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वेंच्या अध्यक्षतेत विशेष सभेचे आयोजन केले आहे. त्यात समिती सदस्यांची निवड होणार आहे.

    ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषदेतील 16 सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. यामध्ये उपाध्यक्षांचाही समावेश होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसींची 16 पदे रद्द करण्यात आली. त्यांच्या जागी नव्याने निवडणुका घेण्यात आल्यात. यामध्ये काँग्रेसने नऊ जागा मिळविल्यात. पण, राष्ट्रवादीला दोन तर भाजपाला एक जागा गमवावी लागली. काँग्रेसच्या वाटेला 11, राष्ट्रवादीला 8 तर भाजपला 6 व शेकापला 2 समित्यांत संधी मिळणार आहे. नुकताच झालेल्या सर्वसाधारण सभेत समितीवर सदस्यांच्या निवडीचा प्रस्ताव काँग्रेसच्या गटनेत्यांनी ठेवला होता. परंतु लगेच विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली.

    26 नगरसेवक गोव्यासाठी रवाना
    नागपूर विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजारामध्ये आपले मतदार फुटू नये, यासाठी भाजपनं रणनीती आखली आहे. नागपूर महापालिकेतील नगरसेवक सहलीला रवाना केले. रविवारी रात्री 26 नगरसेवक गोव्यासाठी रात्री 1 वाजताच्या फ्लाईटन रवाना झाले. बाकी नगरसेवक सोमवारी वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत. नागपूर महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. भाजपचे 108 नगरसेवक आहेत. काँग्रेसकडून अफवा पसरवल्या जात असल्यानं काळजी घेतली जात असल्याचं सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे यांनी सांगितलं.