गारव्यामुळे नागपूरकर गारठले; कमाल तापमानात घसरण

हवामान विभागानुसार गत 24 तासात शनिवारी रात्री 12 ते रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत कमाल तापमानात बरेच चढ-उतार दिसून आले. रविवारी सकाळी 6 वाजता शहराचे कमाल तापमान केवळ 8 डिग्री होते. हळूहळू त्यात वाढ होऊन सकाळी 8 वाजता ते 13 डिग्रीवर पोहोचले. दुपारी 3 वाजताचे तापमान 23 डिग्री होते.

  नागपूर (Nagpur) : ताशी 5 किमी वेगाने वाहणाऱ्या गार वाऱ्यांमुळे वातावरणात अचानक गारठा वाढला असून नागपूरकर चांगलेच गारठले आहे. यादरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा तब्बल 4 डिग्री घसरले तर किमान तापमान मात्र सरासरीच आहे. आता घरात व घराबाहेरही दिवसा थंडी जाणवत आहे. सायंकाळनंतर रस्त्याच्या कडेला व अंगणात शेकोट्या पेटू लागल्या असून थंडीमुळे रात्री 7 वाजतानंतर रस्ते व बाजारपेठा ओस पडल्या होत्या. विशेष म्हणजे रविवारी सुर्योदयाच्या वेळी सकाळी 6.46 वाजता कमाल तापमान केवळ 8 डिग्री तर सुर्यास्ताच्या वेळी 5.36 वाजता 20 डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले. यावरुन थंडीचा अंदाज लावता येतो.

  ४ डिग्री घसरला पारा
  हवामान विभागानुसार गत 24 तासात शनिवारी रात्री 12 ते रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत कमाल तापमानात बरेच चढ-उतार दिसून आले. रविवारी सकाळी 6 वाजता शहराचे कमाल तापमान केवळ 8 डिग्री होते. हळूहळू त्यात वाढ होऊन सकाळी 8 वाजता ते 13 डिग्रीवर पोहोचले. दुपारी 3 वाजताचे तापमान 23 डिग्री होते. सायंकाळनंतर तापमानात आणखी घट होत गेली. रात्र होताच पारा बराच लुडकला. रविवारी रात्री 10 वाजेपर्यंत कमाल तापमान 14 डिग्रीपर्यंत उतरले होते. रविवारी शहराचे कमाल तापमान सरासरीपेक्षा 4 डिग्री तर शनिवारच्या तुलनेत 2.7 डिग्री कमी 24.8 डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान सरासरीपेक्षा 0.9 डिग्री अधिक तर शनिवारच्या तुलनेत 1.7 डिग्री कमी 13.4 डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले.

  दिवसभर जाणवली थंडी
  दिवसभर उत्तरेकडून गार वारे वाहात असल्यामुळे बहुतेकांच्या घराचे उत्तर भागातील दरवाजे-खिडक्या बंदच होत्या. दिवसा घरातही थंडी वाटत असल्यामुळे दिवसभर अनेकांनी उबदार कपड्यांचा आधार घेतला. थंडीपासून बचाव करण्यासाठी दुपारी घराबाहेर पडतानाही प्रत्येकजण उबदार कपडे घालूनच दिसून आला. सायंकाळनंतर थंडीत आणखी वाढ झाल्याने एरवी 10 वाजेपर्यंत उघडे राहणारे घरांचे दरवाजे रात्री 8 वाजेपासूनच बंद झाले होते. हवामान विभागानुसार सोमवारी किमान तापमान 8 डिग्री, मंगळवारी 9 डिग्री तर बुधवारी 10 डिग्रीपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

  असे होते चित्र
  -बाजारपेठांमधील गदीं ओसरली
  -रस्त्यांवरही कमी गदींचा अनुभव
  -शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये थंडावा जास्त
  -सीमेंट रस्ते व दाट लोकवस्तीमुळे अनेक भागात कमी थंडी
  -शहराच्या बाह्यभागात विरळ लोकवस्तीमुळे जास्त थंडी जाणवली
  -सकाळपासूनच शहराच्या अनेक भागात शेकोटया पेटल्या
  -ग्रामीण भागात सायंकाळपासून घरांची दारे बंद.
  -रविवारी सुटीचा दिवस सायंकाळनंतर रस्ते ओस.
  -रात्रीच्या वेळी पुन्हा थंडगार हवा.