नागपूरची एसटी रस्त्यावर धावतेय!, विभागातून धावल्या 18 बसेस; लाखांवर महसूल जमा

कर्मचारी विलीनीकरणावर ठाम असल्याने महामंडळ प्रशासनाने शुक्रवारी निलंबित 16 कर्मचार्‍यांना सेवेतून बडतर्फ केले. या बडतर्फीच्या कारवाईने कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचा सूर आहे. परंतु दुसर्‍याच दिवशी आणखी दोन संपकर्ते कर्मचारीही कामावर परतलेत. त्यामुळे एकूण कामावर रुजू झालेल्यांची संख्या आता 41 वर पोहोचली असल्याची माहिती विभागीय नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिली.

  नागपूर (Nagpur) : नागपूर विभागातील एसटीचे कर्मचारी टप्प्याटप्प्यानं कामावर रुजू होत आहेत. आगारातून बाहेर पडणार्‍या बसेसची संख्याही वाढू लागलीय. संप कालावधीत प्रथमच शनिवारी (ता. 25) विभागातून सर्वाधिक 18 बसेस बाहेर पडल्या. त्यातून झालेल्या प्रवासी वाहतुकीतून विभागाला तब्बल 1 लाख 31 हजारांवरचा महसूल मिळाला. शनिवारी दोन संपकरी कर्मचारी कामावरही रुजू झालेत.

  16 कर्मचारी निलंबित
  कर्मचारी विलीनीकरणावर ठाम असल्याने महामंडळ प्रशासनाने शुक्रवारी निलंबित 16 कर्मचार्‍यांना सेवेतून बडतर्फ केले. या बडतर्फीच्या कारवाईने कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचा सूर आहे. परंतु दुसर्‍याच दिवशी आणखी दोन संपकर्ते कर्मचारीही कामावर परतलेत. त्यामुळे एकूण कामावर रुजू झालेल्यांची संख्या आता 41 वर पोहोचली असल्याची माहिती विभागीय नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिली.

  एक लाख 31 हजारांचा महसूल
  शनिवारी दिवसभरात विभागातील गणेशपेठ 3, इमामवाडा 4, घाटरोड 3, उमरेड 2, सावनेर 3, वधार्मान नगर 2 आणि रामटेक 1 अशा एकूण 18 बसेस आगारातून बाहेर पडल्या. त्या बसेसने 2085 प्रवाशांना घेऊन 54 फेर्‍या करीत 3169 किमीचे अंतर गाठले. यातून महामंडळाला 1 लाख 31 हजार 604 रुपयांचा महसूल मिळाला. संप कालावधीनंतरचा हा विभागाला एका दिवशी झालेला सर्वाधिक महसूल आहे, हे विशेष.

  1800 कर्मचारी संपावर कायम
  परिवहन मंत्र्यांनी या कर्मचार्‍यांच्या पगारात भरघोस वाढ करून कामावर रुजू झाल्यास निलंबनही मागे घेण्याचे आश्‍वस्त केले. परंतु यानंतरही कर्मचारी संपावर ठामच आहेत. त्यामुळं महामंडळाकडून आता कठोर प्रशासकीय कार्यवाहीचे पाऊल उचलण्यास सुरुवात झाली आहे. नागपूर विभागात एसटीमध्ये एकूण 2492 कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी आजघडीला प्रत्यक्ष केवळ जवळपास सातशे कर्मचारी हे कामावर हजर असून, काही अधिकृत रजेवर आहेत. तर अद्यापही तब्बल 1800 वर कर्मचारी संपावर कायम असल्याने एसटीचे परिचलन वाढत नसल्याचे चित्र आहे.

  435 निलंबित कर्मचाऱ्यांपैकी 40 परतले कामावर
  निलंबन करण्यात आलेल्या 435 कर्मचार्‍यांपैकी जवळपास 40 कर्मचारी परिवहन मंत्र्यांच्या आवाहनानंतर कामावर परतले आहेत. परंतु कर्मचारी कामावर रुजूच न झाल्याने गत आठवड्यात 14 व 15 डिसेंबर रोजी महामंडळाने विभागातील संपकर्त्या निलंबित कर्मचार्‍यांपैकी चौकशी पूर्ण झालेल्या 18 कर्मचार्‍यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती.