पायाला खिळा ठोकला, सळई घुसवली, मुत्र पाजले आणि… भारत-पाकिस्तान सीमेवरील अंगावर काटा आणणारी घटना

    बाडमेर : भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या बाडमेर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील गिडा पोलिस स्टेशन परिसरात आरटीआय कार्यकर्त्याला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. अमराराम गोडारा यांचे अपहरण करून हल्लेखोरांनी बेदम मारहाण करून अमानुष छळ केला(Nailing on the feet, inserting a spear, urinating and … a thorny incident on the Indo-Pakistan border).

    हल्लेखोरांनी आरटीआय कार्यकर्त्याचे दोन्ही पाय आणि एक हात तोडला. एवढेच नाही तर क्रौर्याची सीमा ओलांडत त्यांच्या पायाला खिळा ठोकला, सळई घुसवली, मुत्र पाजले आणि तशा अवस्थेत गावाजवळ फेकून दिले. राजस्थानमध्ये झालेल्या घटनेची देशभरात चर्चा सुरू आहे. आरटीआय कार्यकर्ते अमराराम गोडारा हे दारू माफियांविरोधात पोलिसांना सातत्याने माहिती देत होते.

    यासोबतच ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांबाबतही ते आरटीआय कार्यकर्ता म्हणून काम करत होते. मंगळवारी सायंकाळी अमराराम जोधपूरहून आपल्या गावी येत होते. यादरम्यान चोरट्यांनी त्यांचे अपहरण केले. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन बेदम मारहाण केली. मारहाण करून हल्लेखोरांनी अमरारामचे दोन्ही पाय आणि एक हात तोडला. त्यानंतर त्यांच्या पायात खिळे ठोकले.

    याच अवस्थेत गावाजवळ फेकून दिलेल्या अमरराम यांच्याबद्दल गावातील लोकांना माहिती मिळताच लोकांनी अमरारामला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. मात्र अमराराम यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर गंभीर अवस्थेत त्यांना जोधपूरला हालवण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.