नांदेड शहरातील माळटेकडी परिसरात एनसीबीची छापेमारी; मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ केले जप्त

    नांदेड : अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (एनसीबी) सोमवारी नांदेड, जालना आणि औरंगाबादसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत छापेमारी केल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे. दरम्यान, नांदेड शहरातील माळटेकडी परिसरातील एका व्यापारी संकुलातून अफू बोंडे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

    क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील कारवाईनंतर एनसीबी सक्रिय झाली असून विशेष म्हणजे अमली पदार्थांच्या परराज्यातून होणाऱ्या तस्करीचे जाळे मुख्यत: औरंगाबाद, जळगाव, नाशिक जिल्ह्यांतून राज्यभरात पसरले असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर एनसीबीने केलेल्या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे.

    नांदेड जिल्ह्यातील मांजरम (ता.नायगाव) येथे पथकाने १५ नोव्हेंबर रोजी पाठलाग करून ११ कोटींचा गांजा पकडला होता. या वेळी दोन जणांना अटक करण्यात आली होती. जिल्ह्यात पथक तळ ठोकून असून ठिकठिकाणी कसून चौकशी करत आहे. त्यानुसार एनसीबी पथकाने सोमवारी माळटेकडी परिसरातील एका व्यापारी संकुलात धाड टाकली आहे.

    या धाडीमध्ये जवळपास एक क्विंटल वजनाची अफू बोंडे जप्त करण्यात आल्याचे समजते. अफू बोंडांच्या विक्रीवर निर्बंध आहेत. पण, काही विक्रेते जुन्या बनावट परवान्याच्या आधारावर हा अफू बोंडे विक्रीचा व्यवसाय करतात. दरम्यान, या कारवाईबाबत ठाणे हद्दीतील पोलिसांशी संर्पक साधला असता त्यांच्याकडून दुजोरा मिळाला नाही.