विकासनिधी मिळवून खर्च करण्यात राष्ट्रवादीचे मंत्री हुश्शार; कॉंग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, सर्वात कमी निधी शिवसेनेच्या पदरात

गेल्या दोन वर्षात तीन पक्षांमध्ये लोक कल्याणाच्या कामांवर सर्वाधिक खर्च करण्याचा विक्रम करत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत आघाडीवर आहे. या पक्षाच्या वाट्याला आलेल्या अकरा विभागांना सन २०२०-२०२१ च्या आर्थिक वर्षात २ लाख ५० हजार ३८८ कोटींचा सर्वाधिक निधी मिळाला आहे.

  मुंबई  : दोन वर्षापासून राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील तिसरा पक्ष कॉंग्रेसकडून सातत्याने निधी मिळत नसल्याची तक्रार केली जाते. मात्र गेल्या दोन वर्षात तीन पक्षांमध्ये लोक कल्याणाच्या कामांवर सर्वाधिक खर्च करण्याचा विक्रम करत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत आघाडीवर आहे. या पक्षाच्या वाट्याला आलेल्या अकरा विभागांना सन २०२०-२०२१ च्या आर्थिक वर्षात २ लाख ५० हजार ३८८ कोटींचा सर्वाधिक निधी मिळाला आहे. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा हा निधी खर्च करण्याचा म्हणजे लोकोपयोगी कामाचा झपाटा देखील आघाडीवर असून त्यांनी यातील २ लाख २५ हजार ४६१ कोटी लोककल्याणाच्या कामावर खर्च देखील केले आहेत.

  निधीच्या तक्रारी करत कॉंग्रेस दुसऱ्या क्रमांकावर

  तीन पक्षांच्या आघाडीत सर्वात कमी संख्याबळ असलेल्या काँग्रेसनेही नेहमीच निधी कमी पडत असल्याचे पालुपद लावले तरीही १ लाख २१ हजार १४ कोटींचे अनुदान पदरात पाडून घेतले आणि त्यातील १ लाख १ हजार ७६८ कोटींचा निधी खर्च करण्यातही यश मिळवले आहे.

  शिवसेनेच्या आमदारांना सर्वात कमी निधी

  त्या तुलनेते पहिल्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद आणि सर्वाधिक आमदार असूनही त्यांनी केवळ ५४ हजार ३४३ कोटींची रक्कम खात्यांच्या कामांवर खर्च केली आहे. अर्थखाते सांभाळणाऱ्या राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ६६ हजार २८९ कोटींची कामे शिवसेनेच्या अखत्यारीतील खात्यांसाठी मंजूर केली होती. मात्र, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह सेनेच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये प्रत्यक्षात वितरित केलेली रक्कम मात्र कमीच आहे.

  शिक्षण आणि आरोग्य विभागाला सर्वाधिक निधी

  महा‍विकास आघाडी स्थापनेपासून दोन अर्थसंकल्प पारित झाले आणि ४ वेळा पुरवणी मागण्या मंजूर झाल्या.  मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने खर्चात घेतलेली आघाडी सातत्याने कायम आहे. कोरोना साथीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या आरोग्य खात्याला अधिक रक्कम मिळाली आहे. तर काँग्रेसच्या शालेय शिक्षण विभागाला पक्षाकडे असलेल्या खात्यांपैकी तब्बल अर्धी रक्कम मिळाली. मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांनाच नव्हे तर आमदारांनाही अन्य दोन पक्षांच्या तुलनेत तुटपुंजा निधी मिळत असल्याची तक्रार वाढत आहे. पक्षाचे नेत्यांकडे राज्यात दौऱ्यावर असताना निधीच्या तक्रारी आमदार करत आहेत, असे सांगण्यात येत आहे.