
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपचे माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असून, जनसेवा सहकारी पतसंस्थेचे संस्थापक नारायण बारणे यांनी भाजपत प्रवेश केला.
मुंबई येथील पक्ष कार्यालयात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित बारणे यांनी दोन्ही मुले रोहित आणि रोहन बारणे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे कमळ हातात घेतले.
माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाला रामराम ठोकला होता. भाजपच्या विद्यमान नगरसेविका माया बारणे यांचे संतोष बारणे पती आहेत. त्यामुळे थेरगाव आणि परिसरात भाजपाला खिंडार पडणार, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, आमदार लक्ष्मण जगताप यांनी संतोष बारणे यांचे मोठे बंधू नारायण बारणे यांचा दोन्ही मुलांसह भाजपामध्ये प्रवेश घडवून आणला. त्यामुळे संतोष बारणे यांना घरातूनच पहिला दणका बसला असून, भाजपाचा जोरदार पलटवार केला आहे. त्यांचे बंधु नारायण बारणे व पुतणे रोहीत बारणे तसेच वाकड मधील युवा कार्यकर्ते विक्रम कलाटे व अभिजीत गायकवाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, उपमहाराष्ट्र केसरी विशाल कलाटे, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी संतोष कलाटे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदशीव खाडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, वाकड येथील विक्रम कलाटे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.