सांगलीच्या जागेशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कसलाच संबंध नाही; जयंत पाटलांचा खुलासा

सांगली लोकसभा मतदारसंघातून आमचा लढण्याचा विचार होता. पण महाविकास आघाडीतील चर्चेतील मतदारसंघाच्या वाटणीमध्ये येथील जागा काँग्रेस किंवा शिवसेना लढेल.

    इस्लामपूर : सांगली लोकसभा मतदारसंघातून आमचा लढण्याचा विचार होता. पण महाविकास आघाडीतील चर्चेतील मतदारसंघाच्या वाटणीमध्ये येथील जागा काँग्रेस किंवा शिवसेना लढेल. सांगलीच्या जागेशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कसलाच संबंध नाही, असा खुलासा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला. मुलगा प्रतीक पाटील यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मौन बाळगणे पसंत केले.

    माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील पत्रकारांशी सवाद साधला. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, माजी नगराध्यक्ष चिमण डांगे उपस्थित होते. ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सांगली, कोल्हापूर, हातकणंगलेसाठी मागणी होती. चर्चेत सर्वप्रथम त्यांनी सांगलीची जागा मागितली. त्याच जागेसाठी काँग्रेसचा आग्रह होता व आजही आहे. त्याप्रमाणे कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेसमधून लढण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास कोल्हापूरच्या बदल्यात दुसरीची जागा दुसरीकडे जागा द्या, असे सेनेचे म्हणणे आहे.

    हातकणंगले येथून ठाकरे शिवसेनेचा उमेदवार उभा राहिल्यास काहीतरी मार्ग निघेल. यावर अंतिम निर्णय लवकरच होईल. राज्यात महाविकास आघाडीला सर्वसामान्य जनतेचा चांगला प्रतिसाद आहे. लोक उत्स्फूर्तपणे आमच्या पाठीशी राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.