
वाळवा तालुक्यातील पेठनाका येथे खाजगी ट्रॅव्हल्स बसमधून १६ लाख ३० हजार रुपये किंमतीचे कोकेन (Cocaine) अमली पदार्थ बाळगून प्रवास करणारा नायजेरियन तरुण एडवर्ड जोसेफ इदेह (३५, मूळ रा. नायजेरिया, सध्या रा. बेंगलोर) याला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली.
इस्लामपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : वाळवा तालुक्यातील पेठनाका येथे खाजगी ट्रॅव्हल्स बसमधून १६ लाख ३० हजार रुपये किंमतीचे कोकेन (Cocaine) अमली पदार्थ बाळगून प्रवास करणारा नायजेरियन तरुण एडवर्ड जोसेफ इदेह (३५, मूळ रा. नायजेरिया, सध्या रा. बेंगलोर) याला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे १६४ ग्रॅमच्या कोकेन कॅप्सूल मिळून आल्या. न्यायालयाने त्याला १ जानेवारीपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
इस्लामपूर येथील पोलीस निरीक्षकांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून एका खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये एक संशयित कोकेन अमली पदार्थ घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. रविवारी रात्री पोलिसांनी पेठनाका येथील न्यू मणिकंडन हॉटेलजवळ सापळा लावला. पुणे ते बेंगलोर जाणाऱ्या शर्मा ट्रॅव्हल्स बस (केए.५१ एजी १४५७) मधून एडवर्ड हा उतरत होता. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या काळ्या रंगाच्या सॅकमध्ये एक सनसिल्क ब्लॅकशाईन शाम्पूची ६५० मिली मापाची काळ्या रंगाची बाटली आढळून आली. त्यामध्ये कोकेनच्या १५ कॅप्सूल मिळून आल्या. हे कोकेन सुमारे १६ लाख ३० हजार रुपये किंमतीचे आहे. एडवर्ड इदेह विरुद एनडीपीएस कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, २५ नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वाघवाडी फाटा येथे बसने मुंबई ते बेंगलोर प्रवास करत ११ लाख रुपयांचे कोकेन घेऊन जाणाऱ्या टांझानियाच्या तरुणास पोलीसांनी जेरबंद केले होते. त्याच्याकडे १०९ ग्रॅम कोकेन मिळाले होते. आता एका महिन्याच्या अंतरात हा दुसरा परदेशी तरुण कोकेन घेऊन जाताना पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.