१८१७ चा पाईकाचा उठाव

    प्रा. निहार रंजन पटनाईक

    (लेखक हे ओदिशा सरकार मधील माजी उच्च शिक्षण संचालक आहेत.)

    केंद्र सरकारच्या एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमातील महाराष्ट्राचे जोडीदार राज्य असलेल्या ओदिशाच्या इतिहासातील  पाईका या समुदायाने  जुलुमी ब्रिटीश राजवटी विरुद्ध 1817साली केलेल्या बंडाविषयी माहिती देणारा लेख.

     

    ओडिशा प्रांत 1803 साली ब्रिटींशाच्या अधिपत्याखाली आला. यानंतर 14 वर्षांनी, भारताच्या इतिहासात  एक खळबळजनक घटना घडली. पाईका यांचे 1817 चे सशस्त्र बंड म्हणून इतिहासात नोंदला गेलेला हा उठाव, ओडिशातील स्थानिक शेतमजुरांनी जुलमी ब्रिटिश राजवटीविरुद्ध केला होता. खुर्दा इथल्या पाईका या स्थानिक समुदायापासून या बंडाची सुरुवात झाली असली, तरी बघता बघता, ओडिशातील शेतमजूर, जमीनदार आणि सर्वसामान्य लोकांसह अगदी ओडिशातील कांडा या आदिवासी समुदायाचे लोकही या आंदोलनात सहभागी झाले. या उठावाचे नेतृत्व केले, जगबंधू बिध्याधर मोहापात्रा भरामाराबर रॉय, जे ‘बक्षी जगबंधू’ या नावाने लोकप्रिय होते. हे बंड जरी यशस्वी होऊ शकले नाही,तरी अनेक ठिकाणी या लढ्याने हिंसक वळण घेतले.

     

    ब्रिटिशांनी जेव्हा 1803 मध्ये ओडिशामध्ये सत्ता हस्तगत केली, त्यानंतर त्यांनी खुर्दा आणि आजूबाजूच्या प्रदेशातील शेतमजुरांचे शोषण करण्याचे धोरण अवलंबिले. 1817 साली या शेतमजुरांवर आकारण्यात आलेला शेतसारा , 1805 च्या कराच्या तुलनेत  दुप्पट होता. शिवाय अत्यंत निर्दयपणे शेतकऱ्यांकडून हा कर आकारला जात असे.साहजिकच, या जुलमी राजवटीमुळे शेतकऱ्यांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध असंतोष पसरत गेला. यात भर म्हणून की काय, मिठाची एकाधिकारशाही आणि ‘कवडी’ या तिथल्या स्थानिक चलनाचे झालेले अवमूल्यन यामुळे शेतकऱ्यांच्या दुःस्थितीच वाढच झाली.

    ओडिशातील अलीवर्दी खानाच्या राजवटीत मराठा पलटण जेव्हा  तिथला कारभार बघत होती, त्यावेळी मिठाच्या उत्पादन आणि विक्रीवर कोणतेही निर्बंध नव्हते. मात्र ब्रिटिशांनी मिठाचे उत्पादन आणि विक्रीवर एकाधिकारशाही निर्माण केली, त्यामुळे किमती वाढल्या.

    तसेच, आधीच्या हिंदू, मुस्लिम आणि मराठा राजवटीत ओडिशाचे स्थानिक चलन कवडी हेच व्यवहाराचे प्रमुख चलन होते.मात्र, ब्रिटिशांनी या चलनाची किंमत ‘कवडीमोल’ केली, त्यामुळेही लोकांमध्ये संताप होताच, पण त्यांचा त्रास इथेच थांबला नाही. प्रांतात जबाबदार पदांवर असलेल्या स्थानिक उडिया अंमलदारांना पदावरुन हटवण्यात आले. विशेषतः न्याय विभाग, अबकारी आणि पोलीस अशा महत्वाच्या विभागातल्या स्थानिक अधिकाऱ्यांना काढून त्यांच्याजागी बंगाली आणि मुस्लिम अधिकारी नियुक्त करण्यात आले. हे अंमलदार बाहेरच्या प्रांतातील होते आणि त्यामुळे त्यांना स्थानिक शेतमजुरांविषयी काहीही आपुलकी वाटत नसे.उलट त्यांच्या काळात भ्रष्टाचार आणि गरीब शेतकऱ्यांची प्रचंड छळवणूक सुरु होती. या सर्व कारणांमुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेत असंतोष वाढतच गेला.

    या सर्व साचलेल्या असंतोषाला ठिणगी मिळण्यासाठी कारणीभूत ठरला पाईका लोकांमधील वाढलेला संताप. पाईका समुदायाचे लोक खुर्दा राजाचे आणि गढजात पर्वतरांगांमध्ये असलेल्या इतर राजांचे सैनिक असत. युद्धकाळात सैनिक म्हणून लढणारे हे ग्रामीण शांतताकाळात शेती करत. त्यांच्या वेतनपोटी त्यांना जमिनीचे पट्टे जहागीर म्हणून देण्यात आले होते, या जमिनींना ‘पाईकाना जागीर’ असे म्हटले जाई. मात्र, ज्यावेळी ब्रिटिश अधिकारी मेजर फ्लेचर इथला प्रशासक म्हणून नियुक्त झाला, त्यावेळी त्याने या पाईकाना जहागिरीवर भाडं आकारायला सुरुवात केली. हे भाडेही अत्यंत जुलमी पद्धतीनं वसूल केलं जात असे. भाडे न भरल्यास कठोर शिक्षा होत असे. शिवाय दरवर्षी भाड्याच्या रकमेत वाढ होत गेली. परिणामी, पाईका लोकांमध्ये असंतोष होता आणि त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध बंडाचे निशाण फडकवले.

    पाईका उठावाचे आणखी एक कारण म्हणजे जमीनदारांमध्ये असलेला असंतोष. उडिया जमीनदारांची वतने, जमीनदारी ब्रिटिशांनी काढून घेतली.शिवाय त्यांनी आणलेल्या नव्या महसूल व्यवस्थेत देखील अनेक दोष होते, ज्यांचा फटका जमीनदारांना बसला.

    या बंडाला तात्कालिक कारण ठरले ते बक्षी जगबंधू यांच्यावर झालेला अन्याय. बक्षी जहांगीर खुर्दाच्या लष्कराचे सेनापती होते.म्हणजे त्यांचे पद राजाच्या खालोखाल होते. परंपरेने हे पद त्यांच्याच कुटुंबाकडे होते आणि त्यांच्या खर्चासाठी तनखा म्हणून राजाने त्यांनाही जहागीर दिली होती, तिला बक्षीगिर असे म्हटले जाई. त्यांना या जहागिरीपोटी काहीही भाडे द्यावे लागत नसे. शिवाय त्यांच्याकडे रोगंदा गढची जमीनदारी देखील होती, ज्यासाठी त्यांना किरकोळ भाडे भरावे लागत असते. मात्र, ज्यावेळी ब्रिटिशांनी इथे सत्ता हस्तगत केली, त्यानंतर त्यांना राजा आणि बक्षी यांच्यातील कराराचे महत्त्व कळले नाही. दरम्यान, कृष्ण चन्द्र सिंह या बंगाली अंमलदाराने बक्षी जनबंधूंकडून अत्यंत हीन पद्धतीने हा रोगंदा गढ जिंकून घेतला.यामुळे एकेकाळी श्रीमंत आणि प्रतिष्ठित असलेल्या बक्षी जनबंधू यांना अत्यंत अपमानास्पद पद्धतीने वागवण्यात आले. या अपमनामुळे,बक्षी यांचा ब्रिटिशांविरुद्ध संताप झाला.ओडिशमधील शेतमजूर, पाईका सैनिक,अधिकारी, जमीनदार या सगळ्यांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध संताप, असंतोष धुमसत होताच; मात्र त्यांना गरज होती ती एका नेतृत्वाची ! जनबंधू बक्षी यांच्या रुपाने त्यांना हे नेतृत्व मिळाले. बक्षी यांनी त्या सगळ्यांना एकत्र केले आणि ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याची तयारी करण्यात आली.

    याच काळात, ब्रिटिशांनी घुसमरचा लोकप्रिय राजा श्रीकर भांज ला अटक केली, त्याची जमीनदारी देखील काढून घेतली. त्यांच्या सर्व अधिकाऱयांना, नातेवाईकांना देखील तुरुंगात डांबले गेले. अशा अराजकाच्या स्थितीत, बक्षी जनबंधू सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले.

     

    29 मार्च 1817 रोजी खुर्दा उठावाची सुरवात झाली. त्या वेळी घुसमर येथून 400 कंधा क्रांतिकारी बनपूरला आले आणि बक्षी जनबंधू यांच्या सैन्यात सामील झाले. कंधा क्रांतिकऱ्यांनी पोलीस स्थानके, सरकारी खजिना आणि इतर सरकारी कार्यालयांवर हल्ले केले. त्यांनी अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या हत्या केल्या आणि सरकारी खजिन्यातून 15 हजार रुपये लुटून नेले. तेथून ते खुर्दा येथे गेले. पाईका, डालीये आणि डालाबेहेरा जमातीचे क्रांतिकारी  लोक हे बक्षी जनबंधु यांच्या नेतृत्वात या उठावात सामील झाले. अशाप्रकारे पाईकांनी मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांची मालमत्ता नष्ट केली आणि अनेक ब्रिटिशांना यमसदनी पाठवलं. म्हणून ब्रिटिशांनी हे बंड मोडून काढण्यास कठोर पावलं उचलली. या कामासाठी त्यांचे दोन सेनापती सशस्त्र सैन्य घेऊन पाठविण्यात आले. त्यापैकी एक होते लेफ्टनंट प्रिडेक्स आणि दुसरे होते लेफ्टनंट फॅरिक्स. मात्र आपल्या गनिमी काव्याने पाईकांनी त्यांना सळो की पळो करून सोडले आणि ब्रिटिश सैन्याचे अपरिमित नुकसान केले. त्यानंतर ब्रिटिश प्रशासनाने अधिक कार्यक्षम सेनापति ले फेव्हर यांना खुर्दा येथे पाठविले. ते 9 एप्रिल 1817 रोजी तेथे पोहोचले आणि त्याचा ताबा घेतला. पुरीचे राजा मुकुंद देव द्वितीय यांनी क्रांतीकारकांना गुप्तपणे मदत केली होती. त्यामुळे बक्षी जनबंधु दहा हजार पाईका आणि कंधा सोबत घेऊन 12 एप्रिल 1817 रोजी पूरी येथे आले. त्यांनी सरकारी इमारती जाळून टाकल्या. त्यामुळे घाबरलेले ब्रिटिश अधिकारी पुरीहून कटकला पळून गेले. बक्षी जनबंधु यांच्या व्यतिरिक्त कृष्णचंद्र भरामाराबर रॉय, गोपाळ छेत्री आणि पिंडीकी बहुबलेंद्र हे खुर्दा उठावाचे इतर नेते होते.

     

    दरम्यानच्या काळात, खुर्दा उठाव हिंसक झाला. त्यामुळे हा उठाव चिरडण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अतिशय कठोर पावलं उचलली. याची सुरवात पिपली, खुर्दा आणि पुरी येथे लष्करी राजवट लागू करण्याने झाली. हा उठाव मोडून काढण्यासाठी सर्वोच्च लष्करी सेनापति गॅब्रिएल मार्टिनडेल यांची नियुक्ती करण्यात आली. या उठावाचे लोण,  गोप, तिरान, कुजंग, पट्टामंडई आणि असुरेश्वर येथे पसरले. कुजंग वगळता, इतर सर्व ठिकाणी बंड मोडून काढण्यात ब्रिटिश सरकारला यश आले. करण, कुजंगचे राजे मधू सुदन सेंधा हे क्रांतिकारकांच्या बाजूने लढत होते. त्यांना क्रांतिकारी नेते नारायण परमगुरु आणि बामदेव पट्टाजोशी यांची मदत मिळत होती. ब्रिटिश सैन्य अधिकारी कॅप्टन केनेट यांनी बंड मोडून काढण्यासाठी कुजंगच्या दिशेने कूच केले. सप्टेंबर 1817 मध्ये केनेटची पाईकांशी लढाई झाली. त्यानंतर कुजंगच्या राजाने ब्रिटिशांपुढे शरणागती पत्करली. अशाप्रकारे ऑक्टोबर 1817 मध्ये हे बंड मोडून काढण्यात आले. हे बंड संपल्यावर  बक्षी जनबंधु आणि इतर नेत्यांवर खटले चालवून त्यांना शिक्षा सुनावण्यात आली.

    गॅब्रिएल मार्टिनडेल याने सर्वांची सुनावणी घेतली. त्यापैकी काही नेत्यांना शिक्षा झाली. नऊ क्रांतिकऱ्यांना 14 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याचप्रमाणे 123 नेत्यांना आयुष्यभरासाठी समुद्रापार पाठविण्यात आले. परशुराम राऊतरे आणि सच्चिदानंद पटनाईक ज्यांनी चरना पटनाईक आणि सदाशिव रॉय यांचा खून केला होता, त्यांना मृत्युदंड देण्यात आला. मात्र बक्षी जनबंधु यांना पकडण्यात ब्रिटिश सरकारला अपयश आले. शेवटी, हरप्रकारे प्रयत्न करून बक्षी यांना 27 मे 1825 रोजी त्यांना मान्य असलेल्या काही अटींवर शरण येण्यास भाग पाडण्यात आले. त्यांना कटकला परत आणण्यात आले. अंतिमतः 24 जानेवारी 1829 रोजी त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या मृत्यूने शेवटपर्यंत कणखर असलेल्या योध्याचा अंत झाला. एक  प्रसिद्ध नेता आणि ब्रिटिशांना खुर्दा आणि शेवटी ओदिशातून हाकलून लावण्यासाठी केलेल्या उठावाचे नेते म्हणून त्यांच्या नावाची सुवर्णाक्षरांत नोंद झाली आहे. आणि पाईकांचे हे 1817 चे बंड, आता भारतात झालेले ब्रिटिशांविरुद्धचे ‘पाहिले स्वातंत्र्ययुद्ध’ म्हणून मानले जाते.