पळसगांवच्या थेट सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर

मोहिते हे सहकारी सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात उपसरपंच धोंडीराम नथु फडतरे, आकाश खरात, नारायण काळे, रेश्मा घाडगे, सोनाली घाडगे, सविता कळसाईत, सोनाली काळे या सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता.

    वडूज : पळसगांव (ता. खटाव) येथील जनतेतून थेट निवडून आलेले सरपंच जनार्दन गणपत मोहिते यांच्या विरोधातील अविश्वास ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.

    मोहिते हे सहकारी सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात उपसरपंच धोंडीराम नथु फडतरे, आकाश खरात, नारायण काळे, रेश्मा घाडगे, सोनाली घाडगे, सविता कळसाईत, सोनाली काळे या सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता. मात्र मोहिते हे थेट जनतेतून निवडून आल्याने त्यांच्या विरोधात केवळ सदस्यांनी अविश्वास आणून चालणार नव्हते. तर गावातील संपूर्ण मतदारांनी मतदान करणे आवश्यक होते. याकरीता गुरुवारी गावकऱ्यांचे मतदान झाले. यामध्ये अविश्वाच्या बाजूने २४६ मतदारांनी मतदान केले. तर १७० मतदारांनी सरपंच मोहिते यांना समर्थन दिले. त्यामुळे सदरचा ठराव बहुमताने मंजूर झाला.

    गटविकास अधिकारी उदय साळुंखे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. ग्रामसेवक समीर शेख, सुनिल राजगुरु व इतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

    मतदानासाठी सकाळपासूनच रांग लागली होती. दरम्यान थेट सरपंचावरील अविश्वासाचा हा तालुक्यातील पहिलाच प्रयोग असल्याने याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. या निर्णयामुळे मनमानी कारभार करणार्‍या इतर थेट सरपंचांनाही चाप बसणार असल्याची चर्चा आहे.