फुकट बिर्याणी दिली नाही म्हणून कोयत्याने सपासप वार; सिंहगड रस्ता परिसरातील घटना

फुकट बिर्याणी न दिल्याने सराईत गुन्हेगारांनी मॅनेजरवर कोयत्याने सपासप वार (Sickle Attack) करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. सिंहगड रोड परिसरातील हॉटेलमध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली आहे.

    पुणे : फुकट बिर्याणी न दिल्याने सराईत गुन्हेगारांनी मॅनेजरवर कोयत्याने सपासप वार (Sickle Attack) करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. सिंहगड रोड परिसरातील (Sinhagad Road Area) हॉटेलमध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. याप्रकरणी लक्ष्मण सोनवणे (वय २४) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आहे. त्यातील दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे हिंगणे खुर्द परिसरात रिबेल फुल्डर्स प्रा. लिमी. नावाने हॉटेल आहे. दरम्यान, ते शनिवारी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या हॉटेलच्या बाहेर थांबले असता तिघेजण आले. त्यांनी हॉटेल मॅनेजर बिरास्वर दास यांच्याकडे फुकट बिर्याणी मागितली. परंतु, त्यांनी फुकट बिर्याणी देण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपींनी मॅनेजर दास यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. तसेच, हॉटेलची तोडफोड करत गल्ल्यातील रोकड काढून नेली.

    आरोपींनी जातेवेळी देखील हॉटेलवर दगडफेक करून हॉटेलचे नुकसान केले आहे. दरम्यान, यातील दोघेजण सराईत गुन्हेगार असून, एकजण कंबरेला कोयता घेऊनच हॉटेलात आला होता. अधिक तपास उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ हे करत आहेत.