प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका फूट प्रकरण, म्हाडा भरती तसेच शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंत पुणे पोलीसांनी एकुण मिळून २८ आरोपींना अटक केली आहे. आणखीही काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. याप्रकरणात वेगवेगळे पाच गुन्हे दाखल झाले आहेत.

  • संचालकांची चौकशी केली जाणार; पेपर फुटीप्रकरणात धक्कादायक माहिती

  पुणे : आरोग्य विभागाच्या कर्मचारी भरती प्रक्रियेतील प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने दोन दलालांना अटक केली आहे. तत्त्पुर्वी अटकेत असलेले आरोग्य विभाग कार्यालयाचे संचालक डॉ. महेश बोटले यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली असून, ही परीक्षा घेणाऱ्या ‘न्यासा’चा देखील पेपर फुटीत सहभाग आहे. त्यामुळे आता न्यासाच्या संचालकांची चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकारपरिषदेत दिली. यावेळी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके उपस्थित होत्या.

  याप्रकरणी निशीद रामहरी गायकवाड (वय ४३, रा. शेवाळकर गार्डन, अंबाझरी रस्ता, नागपूर, मूळ रा. अमरावती) आणि राहुल घनराज लिघोंट (वय ३५, रा. देवी पार्क, शेगाव रहाटगाव रस्ता, अमरावती) अशी अटक केलेल्या दोन दलालांची नावे आहेत. आरोग्य विभाग प्रश्न पत्रिका फूट प्रकरणात डॉ. बोटले, आरोग्य विभागाच्या लातूर कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे, अंबजोगाईतील आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप जोगदंड यांच्यासह १८ जणांना अटक करण्यात आली आहे.
  आरोग्य विभगाची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन ते चार यावेळेत पार पडली. प्रश्नपत्रिकेतील १०० प्रश्नांपैकी ९२ प्रश्न परीक्षेपूर्वीच समाजमाध्यमावर प्रसारित झाल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणात आरोपींकडून लॅपटॉप व मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. तांत्रिक पुरावे पोलिसांना मिळाले आहेत.

  आरोग्य ‌विभाग गट क परीक्षेतील प्रश्न पत्रिका फोडून गायकवाड तसेच लिघोंट यांनी दलालांमार्फत पैसे घेतल्याची माहिती तपासात मिळाली आहे. आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले यांची चौकशी करण्यात आली. परीक्षा घेणाऱ्या ‘न्यासा’तील संचालकांची चौकशी करण्यात येणार आहे, असे त्यांनी नमूद केले. आरोग्य विभागातले कर्मचारी तसेच दलाल, परीक्षार्थी काहीजन प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात सामील असल्याचे उघड झाले आहे. तपासानुसार इतरांना अटक केली जाणार आहे.

  कोट्यावधी रुपयांचा ऐवज जप्त

  म्हाडा (१० डिसेंबर) परिक्षा होण्यापुर्वीच याप्रकरणाची माहिती मिळाली आणि पोलिसांनी कारवाई केली. वेळेत कारवाई केल्याने परीक्षा रद्द करण्यात आली. परीक्षा घेणाऱ्या बंगळुरूतील जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीसचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख, दलाल संतोष हरकळ, अंकुश हरकळ यांना अटक करण्यात आली होती. म्हाडा प्रश्न पत्रिका फूट प्रकरणाचा तपास सुरू असताना शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, परीक्षा परिषदेचे तत्कालिन आयुक्त सुखदेव डेरे व अश्विनकुमार यांना अटक करण्यात आली. यात सुपे यांच्याकडून आतापर्यंत ३ कोटी २३ लाख ३६ हजार ८४० रुपये, दीडशे तोळे दागिने (दागिन्यांचे मूल्य ६७ लाख ७८ हजार ८०० रुपये) तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले. तर, नुकतीच अश्विनकुमार याच्या घरातून १ कोटी २ लाख रुपयांचे सोने, हिरे व चांदी जप्त केली आहे.

  आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका फूट प्रकरणाचा तपास सुरू आहे. याप्रकरणात आणखी काहीजणांची चौकशी करण्यात येणार असून गैरप्रकार करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू आहे. याप्रकरणात आणखी काहीजणांना अटक होऊ शकते. प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात दलालांची साखळी असून, या गुन्हयाची व्याप्ती मोठी आहे.
  अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे