आक्षेपार्ह ट्विट प्रकरण: समित ठक्करला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर

द्वारका ड्रग प्रकरणात अटक केलेला आरोपीचे मंत्र्यांशी संबंध असल्याचे ट्विट मूळचा नाशिकचा रहिवाशी असलेल्या समित ठक्करने केले होते. याबाबत कळवा मुंब्रा राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा शाखेचे अध्यक्ष दिनेश बाणे यांनी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

    मुंबई (Mumbai) : महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप असलेल्या समित ठक्करला मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.

    द्वारका ड्रग प्रकरणात अटक केलेला आरोपीचे मंत्र्यांशी संबंध असल्याचे ट्विट मूळचा नाशिकचा रहिवाशी असलेल्या समित ठक्करने केले होते. याबाबत कळवा मुंब्रा राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा शाखेचे अध्यक्ष दिनेश बाणे यांनी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आधीच अमलीपदार्थ प्रकरणात भाजप आणि एनसीपीमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण होत असताना जाणीवपूर्वक आधारहिन ट्विट करून वातावरण भडकविण्यात येत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अटकेच्या भीतीपोटी ठक्करने ठाणे सत्र न्यायालयात केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर ठक्कर यांनी अड. ऋषीकेश मुंदरगी यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

    त्यावर मंगळवारी न्या. नितीन सांब्रे यांच्या समोर सुनावणी पार पडली. तेव्हा, दोन्हीं बाजू ऐकून घेत न्यायालयाने गुणवत्तेच्या निकषांवर याचिकेवर सुनावणी घेण्याचे निश्चित केले आणि ठक्कर यांच्या कोठडीची आवश्यकता नाही, अस नमूद करत यापुढे अशाप्रकारचे ट्विट करणार नाही, असे हमीपत्र दाखल करण्याचे निर्देशही ठक्करला दिले. तसेच पंचवीस हजार रुपयांची जामीन आणि तेवढ्याच रकमेचे दोन हमीदार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.