प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

पोलिसांच्या रात्रीच्या गस्त दरम्यान एक संशयित इनोव्हा कारचा पाठलाग करून गाडीची झडती घेतली असता आत मध्ये ६२४ किलो गांजा होता. तो जप्त करण्यात आला. सुमारे १ कोटी २४ लाखाचा गांजा जप्त करत पोलिसांनी गाडी व चालकास ताब्यात घेतली.

    सोलापूर : पोलिसांच्या रात्रीच्या गस्त दरम्यान एक संशयित इनोव्हा कारचा पाठलाग करून गाडीची झडती घेतली असता आत मध्ये ६२४ किलो गांजा होता. तो जप्त करण्यात आला. सुमारे १ कोटी २४ लाखाचा गांजा (Cannabis seized in Solapur) जप्त करत पोलिसांनी गाडी व चालकास ताब्यात घेतली.

    शनिवारी विजापुर नाका पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मुलाणी, पोलीस शिपाई अमृत सुरवसे व प्रकाश राठोड हे रात्रीच्या गस्तीला होते. त्याचवेळी विजापूर रोडवर कर्नाटक राज्यातून सोलापूरच्या दिशेने एक इनोव्हा गाडी वेगाने आली. त्यांनी पोलिसांना पाहताच त्यांचा वेग वाढला. यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी त्वरित त्या गाडीचा पाठलाग करून आडवले असता आतील दोघेजण पोलिसांना पाहून पसार झाले. गाडीच्या मागच्या बाजूला काही पोते दिसले. त्यावेळी गाडी चालकाला विचारले असता त्या पोत्यांमध्ये गांजा असल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन चालकासह पोलीस स्टेशनला आणली. त्या पोत्यांमध्ये सुमारे ६२४ किलो गांजा असल्याचं निदर्शनास आलं. याची किंमत १ कोटी २४ लाख आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

    इनोव्हा गाडीच्या पाठीमागे तवेरा गाडी होती. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करत असताना तवेरा गाडी पसार झाल्याचे पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या इसमावर यापूर्वी कर्नाटक, सांगली या भागात गुन्हे दाखल असल्याची माहिती कडूकर यांनी दिली. यावरून बेकायदेशीर गांजा विक्री करणारी आंतरराज्य मोठी टोळी उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. विजापूर नाका पोलिसांकडून मोठ्या कारवाईची अपेक्षा होती ती झाल्याप्रकरणी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी सर्व टीमचे अभिनंदन करत समाधान व्यक्त केले आहे.