लाकडाचा ओंडका डोक्यात मारल्याने एकाचा मृत्यू

कटी नावाच्या शेत जमिनीवर ऊस तोडणीस आलेल्या दोन मजुरामध्ये आपल्या भावाशी सतत भांडतो, या कारणावरून झालेले भांडण विकोपाला गेले. त्यातून सुनील चंदूलाल मावसकर (मूळ गाव वारी हनुमान भैरोगड ता. तिल्हारा, जि. अकोला) याने आपला मित्र संजय फुलचंद जामुणकर यास डोक्यात ओंडका मारल्याने त्याचा मृत्यू (Crime in Kolhapur) झाला.

    मुरगूड : अवचितवाडी (ता. कागल) येथे कटी नावाच्या शेत जमिनीवर ऊस तोडणीस आलेल्या दोन मजुरामध्ये आपल्या भावाशी सतत भांडतो, या कारणावरून झालेले भांडण विकोपाला गेले. त्यातून सुनील चंदूलाल मावसकर (मूळ गाव वारी हनुमान भैरोगड ता. तिल्हारा, जि. अकोला) याने आपला मित्र संजय फुलचंद जामुणकर यास डोक्यात ओंडका मारल्याने त्याचा मृत्यू (Crime in Kolhapur) झाला. ही घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी सुनील मावसकर याला मुरगूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    संजय जामुणकर, सुनील मावसकर हे दोघेही वारी हनुमान जिल्हा अकोला येथील राहणारे आहेत. दोघेही ऊस तोडणी कामगार म्हणून विनायक मोरबाळे यांच्या ट्रॅक्टरवर काम करण्यास आले होते. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. घटनेच्या दिवशी संजय जामुणकर याचे सुनील मावसकर याचा भाऊ अनिल याच्याबरोबर सतत भांडण होत होते. ‘तुम मेरे भाई के साथ क्यों लढ रहे हो’, असा जाब विचारत सुनील मावसकर याने संजय जामुणकर याच्या डोक्यात लाकडी ओंडका घातला. यात तो जखमी होऊन खाली पडला.

    जखमी अवस्थेत संजय यास मुरगूड ग्रामीण रुग्णालयात ट्रॅक्टर चालक विनायक मोरबाळे यांनी उपचारासाठी दाखल केले. पण उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबतची माहिती विनायक शंकर मोरबाळे (वय ४०, अवचितवाडी) यांनी मुरगूड पोलिसात दिली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बडवे अधिक तपास करत आहेत.