मंगळवेढ्यात एक लाख १९ हजार ८३८ नागरिकांनी घेतला पहिला डोस; अद्याप ‘इतके’ नागरिक लसीकरणापासून दूरच

भविष्यात येणारी तिसरी लाट अर्थात ओमायक्रॉनच्या साथीला टक्कर देण्यासाठी आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक व अन्य आरोग्य कर्मचारी सुसज्ज झाले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

  मंगळवेढा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मंगळवेढा शहर (२३७९८) व ग्रामीण (२००७५९) एकूण लोकसंख्या 2 लाख 24 हजार 557 इतकी असून, आत्तापर्यंत 1 लाख 19 हजार 838 नागरिकांनी पहिला डोस (Vaccination in Solapur) घेतला आहे. अद्यापही ४५,११६ नागरिक डोस घेणे बाकी आहेत. दरम्यान, परदेशातून तीन नागरिक मंगळवेढ्यात आले असून, या नागरिकांवर आरोग्य विभाग ओमायक्रॉन या साथीच्या पार्श्‍वभूमीवर करडी नजर ठेवून आहे.

  मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागाची लोकसंख्या 2 लाख 24 हजार 557 इतकी असून, 18 वर्षांवरील लोकसंख्या 1 लाख 65 हजार 4 इतकी असून, 1लाख 19 हजार लोकांनी पहिला डोस घेतला आहे. अद्यापही पहिल्या डोसविना 45 हजार 166 नागरिक राहिले आहेत. दुसरा डोस 48 हजार 304 लोकांनी घेतला आहे. तर 1 लाख 16 हजार 700 दुसर्‍या डोसविना नागरिक राहिले आहेत. पहिल्या डोसचे काम 73 टक्के पूर्ण तर दुसर्‍या डोसचे काम 30 टक्के झाले आहे.

  प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय डोसची टक्केवारी

  मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय- 99 टक्के, आंधळगांव- 73 टक्के, भोसे-69 टक्के, बोराळे -65 टक्के, मरवडे -60 टक्के, सलगर बु.-68 टक्के, अशी प्राथमिक आरेाग्य केंद्रनिहाय लसीकरणाची टक्केवारी आहे.

  परदेशातून मंगळवेढा शहरात – 1, खवे -1,कचरेवाडी -1 असे एकूण 3 नागरिक येथे आले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. यांची मुंबई विमानतळावर कोरोना टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

  आरोग्य विभागाकडून 8 दिवसांनी पुन्हा चाचणी केली जाणार आहे. सध्या हे तिघेजण आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली क्वारंटाईन करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा आरोग्य अधिकारी शीतलकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाऊसाहेब जानकर यांनी प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतीमार्फत सदस्य, तलाठी, पोलिस पाटील यांच्या सहकार्याने आरोग्य विभागाने घरोघरी जावून लसीकरणाबाबत प्रचार करून लसीकरणापासून दूर राहिलेल्या व्यक्तींना लसीकरणाचे महत्व पटवून देऊन लसीकरणासाठी प्रवृत्त केले जात आहे.

  आरोग्य विभागाकडून लसीकरणासाठी 25 ते 30 टीम दररोज कार्यरत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भाऊसाो जानकर यांनी सांगितले. ओमायक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर ऑक्सिजन सिलेंडर, अ‍ॅब्युलन्स सेवा, कोविड सेंटर आदी सज्ज ठेवण्यात आले असून, त्यामध्ये शहरात वीरशैव व इंग्लिश स्कूल तर ग्रामीण भागात बालाजी नगर येथे कोविड सेंटरला सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर शहरात महिला हॉस्पीटल, दामाजी हॉस्पीटल, संजीवनी हॉस्पीटल हे कोविड हॉस्पीटल म्हणून रेडी ठेवण्यात आले आहेत.

  भविष्यात येणारी तिसरी लाट अर्थात ओमायक्रॉनच्या साथीला टक्कर देण्यासाठी आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक व अन्य आरोग्य कर्मचारी सुसज्ज झाले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तरी मंगळवेढा तालुक्यातील लोकांनी तालुक्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी व संरक्षित करण्याकरिता सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले.