
माढा/सोलापूर : शेळीपालनासाठी फार्मवर देखभालीसाठी ठेवलेल्या कामगारांनीच फार्मवरील शेळ्या, बोकड व एक महिंद्रा बोलेरो असा एकूण ६ लाख ५२ हजारांचा ऐवज चोरून नेला. याबाबत अनिल भारत पवार रा. भोसरे ता. माढा यांच्या फिर्यादीवरून बालाजी दिगंबर पांचाळ रा. ता. उदगीर व ललीत चैतू सदाय रा.बिहारपूर पो. सुंदर बिराजे लखनौर मधुबनी राज्य बिहार या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि.२० रोजी सायं.७ ते दि.२१ रोजी सायं.७ वा दरम्यान चिंकहिल ता. माढा येथे घडली.
पद्मावती ब्रेडींग फार्म या नावाने व्यवसाय
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी अनिल पवार हे पुणे येथे गाडी लायसेन्स व गाडी पासिंगचे काम करतात. पवार यांनी मागील ७ वर्षांपासून खुणेवस्ती ता. माढा येथे शेळीपालनाचा पद्मावती ब्रेडींग फार्म या नावाने व्यवसाय सुरू केला.
शेळ्यांविषयी माहिती विचारली
त्यासाठी दोन कामगार कुटुंबासह कामाला ठेवून फिर्यादी पवार हे
अधून-मधून ये-जा करीत होते. दि.७ सप्टेंबर रोजी पवार हे त्यांच्या फार्ममध्ये आले होते त्यावेळी १४ मोठ्या शेळ्या एक बोकड होते.तसेच दोन कामगार कुटुंबासह व्यवस्थित होते. दरम्यान दि.२० सप्टेंबर रोजी सायं ७ वा. बालाजी पांचाळ याला फोन करुन शेळ्यांविषयी माहिती विचारून घेतली त्यावेळी बालाजी हा फिर्यादीला व्यवस्थित बोलत नव्हता तो दारु पिलेला होता.फार्मवर जाऊन पाहिले असता घडलेला प्रकार
त्यानंतर फिर्यादीने २१ सप्टेंबर रोजी दिवसभर बालाजी याला फोन लावला असता तो लागत नसल्यामुळे सायं.७ वा तडवळे ता.माढा येथील सिद्धू कन्हेरे यांना फोन करुन फार्मवर जाण्यास फिर्यादीने सांगितले. त्यानुसार कन्हेरे यांनी फार्म वर जाऊन पाहिले असता त्यांना एकही शेळी व कामगार तिथे दिसत नसून, पिकअप गाडी (एम एच १२ ओ डब्लु ३५५३) ही नसल्याचे त्यांनी फिर्यादीला सांगितले.
वाहतुकीसाठी घेतलेला पिकअप चोरला
फिर्यादी पवार हे लागलीच पुण्याहून रा.१२ वा चिंकहिल ता. माढा येथील खुणे वस्तीमधील शेळीफार्मवर आले. त्यावेळी त्यांनी देखभालीसाठी ठेवलेल्या दोघा कामगारांनी सदर २ लाख २ हजारांच्या १४ शेळ्या,बोकड व ४ लाख ५० हजारांचा वाहतुकीसाठी घेतलेला पिक अप चोरून नेला असल्याचे दिसले.