दिलासादायक ! उपजिल्हा शासकीय रुग्णालयात केवळ एकच कोरोनाबाधित रुग्ण

उपजिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांसाठी चार वॉर्ड तयार करण्यात आलेले आहेत. एका वॉर्डमध्ये १६ प्रमाणे ६४ वेळप्रसंगी पूर्ण दवाखान्यात सुमारे १०० रुग्णांवर उपचार करण्याची सोय रुग्णालयात करण्यात आली आहे.

    इंदापूर : कोरोनाची साथ सुरु झाल्यानंतर काल (दि.१९) प्रथमच येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील (Sub District Government Hospital) दाखल कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शून्य झाली होती. आज सकाळी केवळ एक रुग्ण दाखल झाला आहे.

    उपजिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांसाठी चार वॉर्ड तयार करण्यात आलेले आहेत. एका वॉर्डमध्ये १६ प्रमाणे ६४ वेळप्रसंगी पूर्ण दवाखान्यात सुमारे १०० रुग्णांवर उपचार करण्याची सोय रुग्णालयात करण्यात आली आहे. रविवार अखेरपर्यंत तालुक्यातील १ लाख ४६ हजार ८३७ रुग्णांची कोरोनाची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये १ लाख ३३ हजार ३५० ग्रामीण भागातील तर १३ हजार ४८७ शहरी भागातील रुग्णांचा समावेश होता. परवापर्यंत ७७ हजार १०४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी ७२ हजार ९७ ग्रामीण भागातील तर ५ हजार २ जण शहरी भागातील होती. रविवारी सर्व दाखल रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आज एक जण दाखल झाला आहे.

    कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या व ओमायक्रॉनच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हे चित्र निश्चित दिलासादायक आहे. मात्र, तरीही उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचा स्टॉफ गाफील राहणार नाही, अशी प्रतिक्रिया उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, डॉ. सुहास शेळके यांनी ‘नवराष्ट्र’शी बोलताना दिली.