लस घेतलेल्यांनाच मिळणार जि.प.त प्रवेश

जिल्ह्यात आत्तापर्यंत उद्दिष्टाच्या तुलनेत ७५ टक्के नागरिकांनीच कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १२ लाख ८२ हजार ३८५ तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ७ लाख ६९ हजार ७०१ अर्थात ६० टक्के आहे.

  धुळे : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधक लस घेणे व मास्कचा वापर करणे हाच प्रमुख उपाय आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आवारात सोमवारपासून ज्यांनी लस घेतली आहे त्यांना प्रवेश दिला मिळेल. लसीकरण वाढावे, कोरोनाचा फैलाव रोखला जावा या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी यांनी हा निर्णय घेतला आहे.

  जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
  जिल्ह्यात आत्तापर्यंत उद्दिष्टाच्या तुलनेत ७५ टक्के नागरिकांनीच कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १२ लाख ८२ हजार ३८५ तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ७ लाख ६९ हजार ७०१ अर्थात ६० टक्के आहे. लसीकरण वाढीसाठी सर्व आस्थापनांनी ज्यांनी लस घेतली असेल त्यांनाच कार्यालयात प्रवेश द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहे.

  प्रवेशद्वारावर पडताळणी
  या पार्श्वभूमीवर लसीकरण वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी यांनी ग्रामीण भागात जात जनजागृती केली. तसेच लस नाही तर योजनांचा लाभ नाही हे धोरण राबवण्यात येणार आहे. त्यानंतर आता जिल्हा परिषदेत ज्यांनी लस घेतली आहे त्यांनाच प्रवेश मिळेल. त्यानुसार सोमवारपासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरच लस घेतली आहे का नाही याची पडताळणी होईल. तसेच ३१ डिसेंबरला सरत्या वर्षाला निरोप देण्यासह नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल आणि ढाब्यांमध्ये गर्दी होईल. याठिकाणीही तपासणी करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाते आहे. तसेच नवीन वर्षात ग्रामीण भागात दहा हजार आणि त्यापुढील लोकवस्ती असलेल्या गावांमधील ग्रामपंचायत कार्यालयापासून सर्वच शासकीय कार्यालयात लस घेतलेली असेल तरच प्रवेश दिला जाईल.

  ९९ टक्के कर्मचाऱ्यांनी घेतली लस
  जिल्हा परिषदेतील ९९ टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. पण आता जिल्हा परिषदेत येणाऱ्या अभ्यागतांनी लस घेतलेली असणे आवश्यक आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सोमवारपासून लस नाही तर जिल्हा परिषदेत प्रवेश नाही हे धोरण राबवण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी यांनी सांगितले.