विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला आधी विरोध, फडणवीस म्हणतात, राज्यपालच निर्णय घेतील

राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठीच्या नियमात बदल केले आहे. त्याला भाजपने जोरदार विरोध केला आहे. मात्र, आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय राज्यपालच घेतील असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

  नागपूर (Nagpur) : राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठीच्या नियमात बदल केले आहे. त्याला भाजपने जोरदार विरोध केला आहे. मात्र, आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय राज्यपालच घेतील असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय थेट राज्यपालांच्या कोर्टात दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

  देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूकी संदर्भात राज्यपालांचे जे अधिकार आहेत. त्याबद्दल राज्यपाल निर्णय घेतीलच. मात्र विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीसंदर्भात जे काही बदल केले गेले आहेत ते भारतीय संविधानाला सुसंगत दिसत नाहीत. म्हणून आम्ही आक्षेपही घेतला होता. अशाप्रकारे सर्व अधिकार काढून घ्यायचे आणि लेजिसलेचरमध्ये एक्झिक्यूटिव्हला अधिक महत्व द्यायचे हे योग्य नाही. म्हणून आम्ही त्यास विरोध करतोय, असं फडणवीसांनी सांगितलं.

  गुंडाळून गुंडाळून काय गुंडाळणार?
  यावेळी त्यांनी अधिवेशनाच्या कालावधीवरूनही पुन्हा एकदा सरकारवर टीका केली. आता आधीच दोन दिवसाचं अधिवेशन शिल्लक आहे. आणखी गुंडाळून गुंडाळून काय गुंडाळणार? सुरुवातीलाच पाच दिवसाचं अधिवेशन ठेवणे म्हणजे अधिवेशन गुंडाळण्याचा सारखे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
  मोदींच्या निर्णयाचं स्वागत

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ते 18 वयोगटालाही व्हॅक्सिन देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचंही फडणवीस यांनी स्वागत केलं. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो की त्यांनी कालच्या सुशासन दिवशी 60 वर्षावरील ज्येष्ठांना बूस्टर डोज देण्याचा निर्णय घेतला. तसेच 15 ते 18 वर्षमधील तरुणांसाठी लसीकरण सुरू करण्याचाही त्यांनी निर्णय घेतला. त्यामुळे ओमिक्रॉनविरोधात लढण्यास बळ मिळेल, असं ते म्हणाले.
  चुरस वाढली

  दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराची आज संध्याकाळी घोषणा होणार आहे. काँग्रेसकडे हे पद असल्याने हे पद कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत. त्यातही भोरचे आमदार थोपटे यांचे नाव सर्वाधिक चर्चेत असताना काल एक ट्विस्ट आला आहे. काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदाचा राऊत यांचा कार्यकाळ संपला. त्यांना या पदावर पुन्हा संधी देण्यात आली नाही. त्यामुळे राऊत यांच्याकडे विधानसभेचे अध्यक्षपद जाण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. तर दुसरीकडे विधानसभेचं अध्यक्षपद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला आणि शिवसेनेकडील वन खातं काँग्रेसला असा बदल होण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळाला नसून आज संध्याकाळपर्यंत सर्व चित्रं स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं जात आहे.