विट्यात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन; नंदकुमार पाटील, उत्तम चोथे यांची माहिती

आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान सोहळा समितीच्या वतीने सहा ते नऊ जानेवारी २०२२ दरम्यान, विटा येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याची माहिती विटा पालिकेचे माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, ज्येष्ठ नेते उत्तम बापू चोथे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    विटा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क :  आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान सोहळा समितीच्या वतीने सहा ते नऊ जानेवारी २०२२ दरम्यान, विटा येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याची माहिती विटा पालिकेचे माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, ज्येष्ठ नेते उत्तम बापू चोथे (Uttam Chothe) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    पाटील व चोथे म्हणाले, खानापूर विधानसभा मतदार संघातील खानापूर, आटपाडी तालुका व विसापूर सर्कलमधील शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी टेंभू योजना अमृतवाहिनी ठरली आहे. या योजनेचे शिल्पकार म्हणून आमदार अनिल बाबर यांच्याकडे पाहिले जाते. या भागात पाणी आल्यानंतर येथील शेतीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. शेतकरी आता नगदी पिकाकडे वळला आहे. आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना गरज आहे ती, आधुनिक तंत्रज्ञानाची व सुयोग्य मार्गदर्शनाची, यासाठी आ. अनिलभाऊ नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी आ. बाबर यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. हवामानाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी संरक्षित शेती सारखे प्रयोग भाऊंनी स्वतः शेतामध्ये केले आहेत.

    या कृषी प्रदर्शनामध्ये संरक्षित शेती, विविध स्वयं संचलित यंत्रणा, यंत्रे यांची थेट प्रात्यक्षिके ठेवण्यात येणार आहेत. २०० पेक्षा जास्त स्टॉल असणाऱ्या या प्रदर्शनामध्ये औजारे, मशिनरी, सिंचन साधने, कृषी निविष्ठा, कृषी तंत्रज्ञान, सौर ऊर्जा, ग्रीन हाऊस, स्वयंचलित संसाधने, गृहोपयोगी वस्तू, महिला बचत गट यांचे स्टॉल्स असणार आहेत. याशिवाय प्रदर्शनादरम्यान विविध चर्चासत्रांचे आयोजन देखील केली जाणार आहे. सहा ते नऊ जानेवारी दरम्यान चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये पशुपक्षी प्रदर्शन देखील लक्षवेधी ठरणार आहे. यामध्ये गाय, बैल, म्हैस व शेळी-मेंढी यांच्या विविध प्रजातीचे पशुधन शेतकऱ्यांना पहायला मिळणार आहे.

    प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे, विट्यात प्रथमच सर्वसामान्य शेतकऱ्यांना हेलिकॉप्टरची सफर अनुभवायला मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सवलतीच्या दरामध्ये हेलिकॉप्टरमध्ये बसता यावे व खानापूर तालुक्यातील टेंभू योजनेच्या भगीरथानंतर झालेल्या बदलाचा अनुभव स्वतः पाहणी करता यावा, यासाठी सवलतीच्या दरामध्ये हेलिकॉप्टरची राइड ठेवण्यात आली आहे. याचे बुकिंग देखील सुरू झाले आहे.

    एका अर्थाने पाच दिवस अनिलभाऊंच्या वाढदिवसा निमित्त पाच दिवस शेतकऱ्यांना विविध माहिती, अनुभव, प्रात्यक्षिके व मनोरंजनाचा खजिनाच मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सन्मान सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी खानापूर तालुका पंचायत समितीचे सभापती महावीर शिंदे, खानापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर, शिवसेनेचे शहराध्यक्ष राजू जाधव, किरण पाटील, अतुल बाबर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.