नगरपरिषदेचा कारभार आपोआपच प्रशासकाकडे जातो; पाचू उघडे यांचा अक्कलकोटेंवर पलटवार

गेल्या पाच वर्षांमध्ये बार्शी नगरपरिषदेने राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली, नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी व सर्व नगरसेवक यांनी अहोरात्र काम करुन जवळपास एक हजार कोटींची विकासकामे केली व यातील काही अंशी कामे अंतिम टप्प्यात प्रगती पथावर आहेत.

    बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बार्शी नगरपरिषदेची मुदत दि. 30 डिसेंबरला संपत असल्याने बार्शी नगरपरिषदेचे सध्याचे नगराध्यक्ष व नगरसेवकांचा कार्यकाल संपुष्टात येतो. त्यामुळे नगरपरिषदेचे सर्व कामकाज आपोआपच प्रशासकाकडे जातो. त्यामुळे नगर परिषदेचे दप्तर ताब्यात घ्या म्हणजे मागणी करणाऱ्याची बौद्धिक दिवाळखोरी दिसून येते, अशी टीका नगरसेवक पाचू उघडे यांनी करत नागेश अक्कलकोटे यांच्यावर पलटवार केला.

    वास्तविक पंधरा वर्षे नगरसेवक असलेले विरोधी पक्षनेते यांचे अज्ञान या ठिकाणी दिसून येत आहे. खरे तर ते स्वत: दहा वर्षे सत्तेत असताना गुंठेवारी कायद्यांतर्गत केलेला घोटाळा, त्यावर झालेली तक्रार व त्या तक्रारीनंतर शेकडो गुंठेवारीच्या फाईल प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आल्या. याला दप्तर ताब्यात घेणे असे म्हणतात.

    दहा वर्षे सत्तेत असताना लेंडी-नाले व गटारीचा गाळ काढण्यात झालेला भ्रष्टाचार, वारसा हक्क नौकरी मध्ये केलेली अनियमितता राज्य नगरोत्थान योजनेमध्ये झालेला भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाचे सिमेंट रस्ते, घन कचरा व्यवस्थापनामध्ये झालेला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार, बाग-बगीचा यांची केलेली दुरावस्था, नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याची झालेली गैरसोय, महाराष्ट्र सुजल निर्मल अभियान अंतर्गत झालेल्या पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचार आणि बार्शी नगरपरिषदेच्या यांच्या सत्ताकाळातील दहा वर्षांत झालेल्या आर्थिक दुरावस्थेच हेच विरोधी पक्षनेते कारणीभूत आहेत, असा घणाघातही नगरसेवक उघडे यांनी केला.

    वास्तविक गेल्या पाच वर्षांमध्ये बार्शी नगरपरिषदेने राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली, नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी व सर्व नगरसेवक यांनी अहोरात्र काम करुन जवळपास एक हजार कोटींची विकासकामे केली व यातील काही अंशी कामे अंतिम टप्प्यात प्रगती पथावर आहेत. कमी कालावधीमध्ये भुयारी गटारी योजना राबवून ती पूर्ण करणारी बार्शी नगरपरिषद ही राज्यातील पहिली नगरपरिषद ठरली आहे.

    दोन वर्षांचा कार्यकाल हा कोरोना महामारीच्या कठीण काळात गेला. या कठीण काळात आ.राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष व नगरसेवकांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन या महामारीचा मुकाबला अतिशय प्रखरतेने केला.