ऑमीक्रोनची दहशत; शेअर बाजार आपटला

- 949 अंकांची निर्देशांकात घसरण - 4.29 लाख कोटींचा फटका

  मुंबई, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शेअर बाजारात (Share Market)कोरोनाचा नवा व्हेरिएंट ऑमीक्रोनची दहशत दिसून आली. या दहशतीमुळेच व्यवसायाच्या प्रारंभी आलेली  तेजी अखेरपर्यंत कायम राखण्यात अपयश आले आणि व्यवसायाअखेरीस पडझडीसह बाजार बंद झाला.  मुंबई स्टॉक एक्स्चेंजचा (बीएसई) निर्देशांक 949.32 अंकांच्या पडझडीसह 57,000 खाली घसरून तो 56,747.14 वर तर एनएसईमध्ये निफ्टीही जवळपास 284.45 अंकांच्या घसरणीसह 17000 खाली घसरला व अखेरीस तो 16,912.25 च्या स्तरावर स्थिरावला. या पडझडीसह गुंतवणूकदारांना तब्बल 4.29 लाख कोटींचा फटका बसला आहे.

  प्रारंभीच 300 अंकांची घसरण
  57,778  सुरू
  57,781  झेप
  56,687 घसरण
  56,747 स्थिर

  सर्वच 30 शेअर्समध्ये पडझड
  निर्देशांकातील सर्वच 30 शेअर्समध्ये पडझड झाली.  सर्वाधिक घसरण इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस आणि एचसीएल टेकमध्ये झाली. या सर्व शेअर्समध्ये 3 टक्क्यांची घसरण झाली.  याशिवाय निफ्टीतील सर्व 11 निर्देशांक लाल चिन्हावरच व्यवसाय करीत होते.

  भांडवली मूल्यात घट
  शेअर बाजारात झालेल्या पडझडीमुळे  बाजारातील भांडवलात 4.29 लाख कोटींची तूट झाली आहे. शुक्रवारी बाजार भांडवल 261.02 लाख कोटी रुपये होते ते सोमवारी 256.73 लाख कोटींवर आले.

  आशियातील बाजारातही नुकसान
  आशियातील अन्य बाजारांमध्ये चीनमधील शांघाई कंपोझिट, हाँगकाँगमधील हैंगसेंग आणि जपानमधील निक्कीलाही ऑमीक्रोन संसर्गाच्या वृत्ताचा जबर फटका बसला. याउलट दक्षिण कोरियातील कॉस्पीमध्ये मात्र तेजी दिसून आली.  युरोपातील अन्य बाजारांमध्येही दुपारनंतर तेजी होती.