
जयसिंगपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : ‘माझ्या पोरांना खूप मारलं आहे, अशा रीतीने वाईट मारु नका’, आम्ही मोलमजूरी करुन मुलांना वाढवले आहे. पोलिसांना असा कोणता अधिकार आहे. गेल्या तीन दिवस आमच्या मुलांना अन्न-पाणी दिले नाही, निव्वळ बेदम मारहाण केल्यानेच ‘माझ्या मुलाला उपचारासाठी सांगली दवाखान्यात नेले आहे. यात माझ्या पोराचे काय कमी जास्त झाले तर मी पोलिस ठाण्यासमोर बरे वाईट करुन घेईन’ असा आक्रोश करीत संशयित आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप करत जयसिंगपूर पोलिस ठाण्यासमोर धिंगाणा घातल्याने एकच खळबळ उडाली.
कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टोळीवर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यातील ६ संशयित आरोपीना तपासासाठी न्यायालयाच्या आदेशाने जयसिंगपूर पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजने यांच्या ताब्यात दोन दिवसापुर्वी दिले होते. त्यांना जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या सबजेलमध्ये ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, यातील संशयित आरोपी अजय सुनिल माने (वय २६, रा.जवाहनगर जुना कंदलगांव नाका, कोल्हापूर) याची तब्येत अचानक बिघडल्याने जयसिंगपूर पोलिसांनी त्यांला तातडीने जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र, त्यांची तब्येत अंत्यत चिंताजनक असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ.पांडुरंग खटावकर यांनी तात्काळ सांगली येथील सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.
याची माहिती मिळताच संशयित आरोपीची नातेवाईक व मित्र मंडळीनी जयसिंगपूर पोलिस ठाणे गाठत पोलिसांना जाब विचारला. यामुळे पोलिस ठाण्याच्या परीसरातील वातावरण तणावपुर्ण झाले होते.
अखेर नातेवाईक संशयितांची आई छाया माने, बहिण रेश्मा माने यांच्यासह नातेवाईक श्रीधर जाधव, विजय माने, मंगल आढाव, सचिन आवळे, राणी यादव यांच्यासह नातेवाईकांनी पोलिस ठाण्याच्या आवारात मोठा गोंधळ घातला आणि पोलिसांनी संशयिताला जबर मारहाण करुन उपाशी ठेवल्याचा आरोप करत आक्रोश केला. रुग्णालयातील संशयितांची माहिती घेवून धिंगाणा घातला.
या घटनेनंतर पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी सहा.पोलिस उपनिरीक्षक चळचुक यांच्यासह पोलिसांना पाचारण करुन नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकार शनिवारी दुपारपासून सायकांळी पाच वाजेपर्यत सुरु होता.
संशयित आरोपी आरसी गँगमधील
६ संयशित आरोपी हे आर.सी गँगमधील असून, त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. न्यायलयाने त्यांना पोलिस कोठडी दिल्याने तपासासाठी त्यांना जयसिंगपूरात आणण्यात आले आहे. त्यातील अजय माने याची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर असून नातेवाईकांच्या आरोपात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही.
– रामेश्वर वैंजने, पोलिस उपाधिक्षक जयसिंगपूर