
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी तातडीने धाव घेतली. पोलिसांनी आंदोलक प्रवाशांची समजूत घातल्यानंतर सर्व प्रवाशांना रेल्वेत बसवण्यात आले.
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्रीच्या सुमारास लातूरच्या प्रवाशांनी एकच गोंधळ घातला. रेल्वे स्थानकात आलेल्या मुंबई-बिदर एक्स्प्रेसमध्ये जागा नसल्यामुळे आतील प्रवाशांनी रेल्वेचा दरवाजे बंद केले होते. त्यामुळे लातूरला जाणाऱ्या प्रवाशांनी एकच गोंधळ घालत मुंबई-बिदर एक्स्प्रेस रोखून धरली होती.
आज राज्यातील ग्रामपंचायतच्या निवडणूक पार पडत आहेत. लातूर जिल्ह्यातील 351 ग्रामपंचायतची आज निवडणूक होत आहे. या निमित्ताने पुणे मुंबई वरुन मोठ्या प्रमाणावर अनेक जण मतदानासाठी लातूरच्या दिशेने येण्यासाठी निघाले. दरम्यान, मुंबई-बिदर एक्स्प्रेस काल रात्री मुंबईवरून पुण्यात येतानाच प्रचंड गर्दीने भरून गेली होती. त्यानंतर ही गाडी पुणे रेल्वे स्टेशनवर आली तेव्हा गाडीत जागा नसल्याने आतील प्रवाशांनी दरवाजे उघडले नाहीत. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांनी एकच गोंधळ केला. पुणे आणि जवळील भागातून लातूरच्या दिशेने येणाऱ्या लातूरकरांनी एक्स्प्रेसमध्ये शिरण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांना रेल्वेत येऊ दिले नाही त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे स्टेशनवर चांगलाच गोंधळ घातला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी तातडीने धाव घेतली. पोलिसांनी आंदोलक प्रवाशांची समजूत घातल्यानंतर सर्व प्रवाशांना रेल्वेत बसवण्यात आले.