अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून; रूवले-सुतारवाडीतील घटना

तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील रूवले - सुतारवाडी येथे ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केला. तिचा मृतदेह ओढ्यात टाकल्याची धक्कादायक घटना घडली.

  पाटण / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील रूवले – सुतारवाडी येथे ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केला. तिचा मृतदेह ओढ्यात टाकल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच ढेबेवाडीचे एपीआय संतोष पवार यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संशयित आरोपीला ताब्यात घेतले. संतोष थोरात असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.

  घटनास्थळी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे किशोर धुमाळ, कराडचे डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली व पुढील तपासाबाबत मार्गदर्शन केले.

  ढेबेवाडी येथून ७ किलोमीटर अंतरावर डोंगर परिसरात रूवले- सुतारवाडी गाव आहे. या संतापजनक घटनेने सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली.

  याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील रवले-सुतारवाडी येथील पीडित मृत अल्पवयीन मुलगी बुधवारी २९ रोजी सायंकाळी बेपत्ता झाली होती. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत संबंधित मुलीच्या कुटुंबीय, नातेवाईकांनी शोध घेतला. परंतु, ती मिळून आली नाही. गुरुवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास रवले- सुतारवाडी येथे घटनेतील पीडित मृत मुलीच्या घरापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर ओढ्यात तिचा मृतदेह आढळून आला.

  कठोर कारवाईचे आदेश

  घटनास्थळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. तसेच दोषीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.