
पाकिस्तानी खेळाडू रमीझ राजा यांनी पाकिस्तानच्या संघाला आणि कर्णधार बाबर आझमला चांगलेच सुनावले आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान : काल भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये महामुकाबला झाला आणि भारताच्या संघाने पाकिस्तानच्या संघाचा चांगलाच धुराळा उडवला. या सामन्यात पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव झाला. भारताने पाकिस्तानवर ७ गडी राखून विजय मिळवल्यानंतर, विश्वचषकापुर्वी पाकिस्तान संघाचे गोडवे गाणारे पाकिस्तानी दिग्गज आता संघावर टीका करत आहेत. दिग्गज पाकिस्तानी खेळाडू रमीझ राजा यांनी देखील लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानी संघावर ताशेरे ओढले आहेत. यावेळी त्यांनी पाकिस्तानी संघाला एक विनंती देखील केली.
पाकिस्तानी खेळाडू रमीझ राजा यांनी पाकिस्तानच्या संघाला आणि कर्णधार बाबर आझमला चांगलेच सुनावले आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान हतबल झालेला पाहून रमीझ राजा यांनी पाकिस्तानी संघाचे कान टोचले. ते म्हणाले की, “हे पाकिस्तानी लोकांच्या भावना दुखावणार आहे. जेव्हा तुम्ही भारताविरोधात खेळत असाल, तेव्हा तुम्हाला माहिती हवं की ९९ टक्के भारतीय मैदानात भारताला पाठिंबा देणारे आहेत, ज्याचा परिणाम तुमच्यावर नक्की होणार आहे. तुम्ही भारवून जाणार हे देखील मला समजतं. जर तुम्हाला जिंकता येत नसेल तर, निदान तुम्ही स्पर्धा तरी केली पाहिजे.”
भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन संघांमध्ये पार पडलेल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने पाकिस्तानवर ७ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान संघाने सुरुवात मजबूत केली होती. त्यांच्या १५२ धावसंख्येवर फक्त दोन फलंदाज बाद होते. मात्र, नंतर पाकिस्तानची अवस्था १९१ धावसंख्येवर सर्वबाद अशी झाली.