पाटण नगरपंचायतीच्या लढतीत राजकीय ‘गरमागरमी; राजकीय हालचाली गतिमान

    पाटण : पाटण नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शहरातील अनेकांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली असून, प्रभागातील इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. ही निवडणूक रंगतदार होणार असलीतरी पाटणकर व देसाई या दोन गटातच काँटे की टक्कर पहावयास मिळणार आहे.

    दरम्यान, सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराजीत करून सत्यजितसिंह पाटणकर यांनी यश मिळविल्याने पाटण नगरपंचायतीत एकहाती विजय मिळविण्यासाठी पाटणकर गट आक्रमक झाला आहे.

    पाटण नगरपंचायतीत शिवसेनाही आपले संख्याबळ वाढविण्यासाठी जोरदार राजकीय खेळी करत प्रयत्नात आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही. इच्छुकांनी मतदारांसाठी आतापासूनच जेवणावळी सुरू केल्या आहेत. त्यासाठी हॉटेलमध्ये स्वतंत्र खाती सुरू करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

    पाटण नगरपंचायतीची निवडणूक रंगतदार होणार असलीतरी खरी लढत पाटणकर विरुद्ध देसाई अशीच होणार आहे. पाटणकर गटाकडून १७-० साठी जय्यत तयारी सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत विरोधकांना शिरकाव करू द्यायचा नाही, असा चंग पाटणकर गटाने बांधला आहे. शिवसेनेकडूनही नगरपंचायतीमधील शिवसेना नगरसेवकांचे संख्याबळ वाढविण्यासाठी ‘रात्रीस खेळ’ सुरू झाले आहेत.

    पाटणकर गटाकडे इच्छुकांची भाऊगर्दी

    पाटण नगरपंचायतीसाठी १७ प्रभागांसाठी १७ उमेदवार अशी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. सध्या पाटण नगरपंचायत सत्यजितसिंह पाटणकर गटाकडे आहे. १७ नगरसेवकांपैकी १४ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पाटणकर गटाचे आहेत तर २ नगरसेवक शिवसेना पुरस्कृत देसाई गटाचे आणि १ भाजपचा आहे. राष्ट्रवादी तथा पाटणकर गट, शिवसेना तथा देसाई गट, भाजप, काँग्रेस अपक्ष उमेदवार असल्याने नगरपंचायतीची निवडणूक रंगतदार होणार आहे.

    पाटणकर गटातून विजयाची हमखास खात्री असल्याने पाटणकर गटाकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे.

    शिवसेना सर्व १७ जागा लढवण्याचा तयारीत

    शिवसेना तथा देसाई गटाकडूनही यंदा प्रथमच १७ प्रभागांसाठी १७ उमेदवार निश्चित केल्याचे समजते आहे. राष्ट्रीय काँग्रेसनेही यापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन नगरपंचायत निवडणूक पूर्ण क्षमतेने लढविणार असल्याची घोषणा केली असली तरी काँग्रेसच्या गोटातून अद्याप कोणतीही हालचाल नसल्याचे दिसत आहे. भाजपमधून काही ठिकाणी उमेदवार निश्चित केल्याचे समजते आहे. यात अपक्षांचीही भर आहेच. त्याशिवाय इतर काही पॅनेलही असणार आहेत. मनसेची भूमिका अजून गुलदस्त्यात आहे.