आत्महत्या करणाऱ्या एसटीच्या 57 कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत सकारात्मक: अनिल परब यांची माहिती

एसटी कर्मचारी संपाबाबत सध्या न्यायप्रविष्ठ बाब असल्याचे सांगत त्यानी याबाबत समितीचा अहवाल प्रलंबित असल्याचे सांगितले. ते म्हणाले की दरम्यान, इतर राज्यांच्या तोडीचे किंवा समकक्ष अशीच पगारवाढ कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आम्ही संपकऱ्यांशी चर्चा करीत आहोत, २५ हजार कर्मचारी कामावर हजर झाले आहेत,

    मुंबई (Mumbai) :  एस टी महामंडळाच्या ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या ५७ कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत सकारात्मक आहोत असं आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी  विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केले. या कर्मचाऱ्यांनी कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली याबाबत चौकशी करण्यात येत आहे, ती पूर्ण झाल्यावर त्यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत महामंडळाला सूचना देण्यात आल्याचे परब म्हणाले, याबाबत च्या ते प्रश्नाला उत्तर देत होते. परब म्हणाले की, ३४३ कर्मचाऱ्यांची प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम देणे बाकी आहे, वारस तपास पूर्ण झाल्यावर त्यांची सुमारे ४ कोटींची रक्कम संबंधित विभागीय नियंत्रकांकडे जमा आहेत ती देण्यात येईल असेही परब यांनी सांगितले.

    इतर राज्यांच्या तोडीचे किंवा समकक्ष पगारवाढ
    एसटी कर्मचारी संपाबाबत सध्या न्यायप्रविष्ठ बाब असल्याचे सांगत त्यानी याबाबत समितीचा अहवाल प्रलंबित असल्याचे सांगितले. ते म्हणाले की दरम्यान, इतर राज्यांच्या तोडीचे किंवा समकक्ष अशीच पगारवाढ कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आम्ही संपकऱ्यांशी चर्चा करीत आहोत, २५ हजार कर्मचारी कामावर हजर झाले आहेत, बाकीच्यांनी ही व्हावे असे परब यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. १२ हजार संचित तोटा असतानाही या संपामुळे ६५० कोटींचे आणखी नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली.

    महिनाभरात चौकशी करून कारवाई
    अन्य प्रश्नाच्या  उत्तरात नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील काही पाणीपुरवठा योजना पूर्ण नसताना त्या पूर्ण दाखवून अपहार केल्याप्रकरणी अधीक्षक अभियंता ,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत १ महिन्यात चौकशी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात दिले. ज्या योजना अपूर्ण आहेत त्यांचा समावेश राष्ट्रीय जलमिशन मध्ये समाविष्ट करून त्या पूर्ण केल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.