दानापाणी मिळालं तरच असे पोपट मिठू-मिठू बोलतात : माजी आयुक्त प्रभाकर देशमुख

ज्यांनी तालुक्यात सहकार संस्था काढून मोडीत काढल्या, यातून शेकडो ठेवीदारांचे संसार उध्वस्त झाले, अशा लोकांनी नक्की गद्दार कोण? हे आत्मपरीक्षण करावं, जनतेनं हे ठरवूनच बाजूला केलं असून, दानापाणी मिळालं तरंच असे पोपट मिठू मिठू बोलतात, ज्या हुतात्म्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणांचे बलिदान दिले.

    वडूज : ज्यांनी तालुक्यात सहकार संस्था काढून मोडीत काढल्या, यातून शेकडो ठेवीदारांचे संसार उध्वस्त झाले, अशा लोकांनी नक्की गद्दार कोण? हे आत्मपरीक्षण करावं, जनतेनं हे ठरवूनच बाजूला केलं असून, दानापाणी मिळालं तरंच असे पोपट मिठू मिठू बोलतात, ज्या हुतात्म्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणांचे बलिदान दिले, आपला तालुका सुजलाम सुफलाम व्हावा, असं त्यांच स्वप्न होतं. त्यांच्या स्मारकाचे ठिकाणी अशा अत्यंत पातळीवर बोलणाऱ्या खालच्या थरांची संस्कृती असलेल्या व्यक्तींकडे आपण लक्ष न देता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विचारांचं धोरण अवलंबत खटाव माणचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे मत खटाव माण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी वडूज येथील आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

    काही दिवसांपूर्वी सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर वडूज येथील मिरवणूक रॅलीमधील सभेत येथील हुतात्मा स्मारकामध्ये तालुक्यातील एका माजी आमदारानी खटाव तालुक्यातील जनतेनं ज्याला १४००० मतांचं लीड दिलं, तोच नालायक आणि गद्दार निघाला, अशा प्रकारचे वक्तव्य केलं होतं, याला अनुसरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माण खटाव नेते माजी आयुक्त प्रभाकर देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीनं वडूज येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.

    यावेळी मायणी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, माजी सभापती संदीप मांडवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष हिंदुराव गोडसे, तालुका अध्यक्ष बाळासाहेब पोळ, माजी नगराध्यक्ष सुनील गोडसे, छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी सुरेंद्र गुदगे यांनी प्रभाकर देशमुखांनी मागील चार ते पाच वर्षात माण खटावसाठी अनेक महत्वाची विकासात्मक कामे केली असून, प्रशासनानेही उत्कृष्ट कामाबद्दल दोनवेळा पंतप्रधान पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. संस्था बुडवून अनेकांना देशोधडीला लावणाऱ्यांनी एका निष्कलंक व्यक्तिमत्वावर टीका करणं हीच मुळात हास्यास्पद गोष्ट असून, अशा प्रवृत्तीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेध करतो, असं सांगितलं. तर माजी सभापती संदीप मांडवे यांनीही माजी आमदारांनी केलेलं विधान अत्यंत चुकीचे असून, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या विकासात्मक धोरणांमुळे जाणूनबुजून खाली खेचण्यासाठी अशा व्यक्ती प्रयत्न करत असून, आम्ही कायम प्रभाकर देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचं सांगितले‌.