सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढविण्यासाठी प्रँकचे फॅड वाढले, नागपुरकरांच्या हृदयाच्या धडधडीतही वाढ

'क्षुल्लक लाइक्स, फॉलोअर्स आणि कमेंटसाठी कुणाला छळणे मुळात योग्य नाहीच. ज्याच्यावर प्रँक झाले, त्याला मानसशास्त्रीय भाषेत 'पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर' होण्याची शक्यता वाढू शकते. प्रँकमुळे प्रौढांच्या मनात भीती, अफवा, झोपमोड व अंधश्रद्धा वाढू शकते. प्रसंगी जीवहानीही होऊ शकते.

  नागपूर (Nagpur) : रात्री तुम्ही सेमिनरी हिल्ससारख्या भागातून जात आहात. अचानक पांढऱ्या कपड्यांतील आकृती तुमच्यासमोर येईल… एखादवेळी तुम्ही आपल्या बाइकने जात असाल, आपल्याच विचारांत असाल, तेवढ्यात कुणीतरी मागाहून येईल आणि जोराने ओरडून तुम्हाला दचकवेल… प्रँकचे हे प्रकार आता नागपुरातही घडू लागले आहेत. इतरांची मजा होत असली, तरी हे प्रकार घातक आहेत.

  आधी प्रँक म्हटले की एप्रिल फुल अर्थात एप्रिलच्या पहिल्या तारखेलाच ते केले जायचे. आता यूट्युब, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढविण्यासाठी असे प्रकार होऊ लागले आहेत. यामुळे विविध वयोगटांतील लोकांत मानसिक विकार वाढू शकतात, असे तज्ज्ञ सांगतात.

  लहानपणी केल्या जाणाऱ्या खोड्या आता मोठ्यांचे प्रँक झाले आहेत. यूट्युब आणि इन्स्टा रिल आल्यापासून या प्रँक कल्चरचे रूप बदलले आहे. लोकांना त्रास देणे आणि त्याला प्रँकचे नाव देणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. यूट्युबनेही २०१९च्या जानेवारी महिन्यात काही धोकादायक चॅलेंजेस आणि प्रँकवर बंदी घातली आहे.

  प्रँकमध्येही विविध प्रकार आले आहेत. यात सोपे प्रँक, ऑफिस प्रँक, नॅस्टी प्रँक, स्कूल प्रँक, मीन प्रँक, फेम प्रँक आदींचा समावेश आहे. या प्रँकच्या नावाखाली स्टोअरमध्ये प्रचंड गोंधळ करणे तुम्हाला मजेदार वाटेल, पण ते निश्चितच योग्य नाही. इतरांना हसवण्यासाठी खोड्या आपण समजू शकतो. मात्र, त्यामुळे कुणाचे नुकसान होत असेल, खिल्ली उडवली जात असेल तर, सार्वजनिक ठिकाणी नासधूस होत असेल तर हा अपराधच आहे, असे मत शहरातील तरुणाईने व्यक्त केले आहे.

  ‘क्षुल्लक लाइक्स, फॉलोअर्स आणि कमेंटसाठी कुणाला छळणे मुळात योग्य नाहीच. ज्याच्यावर प्रँक झाले, त्याला मानसशास्त्रीय भाषेत ‘पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर’ होण्याची शक्यता वाढू शकते. प्रँकमुळे प्रौढांच्या मनात भीती, अफवा, झोपमोड व अंधश्रद्धा वाढू शकते. प्रसंगी जीवहानीही होऊ शकते. हा प्रकार थांबवायला हवा’, असे मत ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ प्रा. राजा आकाश यांनी व्यक्त केले.

  आनंद वाटा…
  ज्यामुळे कुणाचे नुकसान होणार नाही, अशी खोडी एकवेळ ठीक. कोणत्याही मालमत्तेचे नुकसान होऊ नये, एखाद्या व्यक्तीचा अपमान, अवमूल्यन होऊ नये, याची काळजी घेतली जावी. हे ‘हेल्दी प्रँक’मध्ये गणले जाते. कुणाला त्रास न देता मजेदार गेम व टास्क दिले जावे, भेटवस्तू किंवा फ्री-हग देऊन त्यांना आनंद द्यावा, असे मत सूज्ञ तरुणाई व्यक्त करते.