ओमायक्रॉनच्या सावटामध्येही नववर्षाच्या स्वागताची तयारी; पोलिसांची करडी नजर

सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागताला अवघा एक दिवस उरला आहे. तर कोरोनामुळे संपूर्ण वर्ष शांततेत गेल्यामुळे शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील तरुणाईने सेलिब्रेशनची जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, ओमायक्रॉनच्या वाढत्या सावटामुळे नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनला काही मर्यादा आल्या आहेत.

    सातारा : सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागताला अवघा एक दिवस उरला आहे. तर कोरोनामुळे संपूर्ण वर्ष शांततेत गेल्यामुळे शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील तरुणाईने सेलिब्रेशनची जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, ओमायक्रॉनच्या वाढत्या सावटामुळे नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनला काही मर्यादा आल्या आहेत. सातारा जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू असून, उत्साही तरुणांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

    ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे सातारा जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध जाहीर करत सार्वजनिक कार्य क्रमांमध्ये उपस्थितीवर मर्यादा आणली आहे . रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे . त्यामुळे सातारा शहरालगतचे प्रायव्हेट बंगले आणि फार्म हाऊसेस ला पसंती दिली जात असून कास मार्गावरील बहुसंख्य हॉटेल्सची यापूर्वीच बुकिंग झाली आहे . कास बामणोली पाचगणी महाबळेश्वर तापोळा तेटली या निसर्गरम्य ठिकाणांवर पर्यटकांची गर्दी झाली आहे. वनविभागाने सुद्धा वन परिक्षेत्रात कोठे मेजवानी होणार नाही याची काळजी घेतली आहे.

    कराड पाटण जावली सातारा महाबळेश्वर या पाच तालुक्याच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना नियुक्त दहा कर्मचार्यांच्या पथकासह कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग सक्तीचे करण्यात आले आहे. जिल्हा वाहतूक शाखेने ओमायक्रॉनच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मद्यपान करणाऱ्या वाहनचालकांची कसून तपासणी करण्याचे नियोजन केले आहे . वाहनांची तपासणी शहराच्या प्रत्येक एण्ट्री पॉईंटवर होत आहे . या उपचारांचा ससेमिरा टाळण्यासाठी प्रायव्हेट बंगलोना पसंती आहे . पाच हजार रुपये शुल्क आकारून हे बंगले भाड्याने दिले जात आहे .

    प्रतिबंधक लशीचे दोन डोस झाल्याने नागरिकांनी ओमायक्रॉन ला बाजूला ठेवत पर्यटनाला बाहेर पडणे पसंत केले आहे . मटण आणि चिकन मेजवानीचे बेत यापूर्वीच ठरले असून सामिष मेजवानींची लोकवर्गणी सुद्धा जमा झाली आहे . सातारा शहर व तालुका पोलिसांनी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे .