सभा पंतप्रधान मोदींची अन् ‘खुर्च्या’ राहुल गांधींच्या; चूक लक्षात आली अन् लगेच…

यवतमाळमधील या सभेच्या स्थळी सावळा गोंधळ पाहयला मिळाला. नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये चक्क विरोधक राहुल गांधी यांच्या फोटो असलेल्या खुर्च्या ठेवलेल्या दिसून आल्या आहेत.

    यवतमाळ : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते महिला बचत गटातील महिलांशी संवाद साधणार आहे. निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी यांचा महाराष्ट्र दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. दरम्यान, यवतमाळमधील या सभेच्या स्थळी सावळा गोंधळ पाहयला मिळाला. नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये चक्क विरोधक राहुल गांधी यांच्या फोटो असलेल्या खुर्च्या ठेवलेल्या दिसून आल्या आहेत.

    आज यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सायंकाळी चार वाजता जाहीर सभा होणार आहे. भाजप महाराष्ट्र कडून या पंतप्रधानांच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र या तयारीमध्ये घोडचूक झाली. सभास्थळी चक्क काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे स्टीकर खुर्च्यांवर लावलेले दिसून आले. त्यामुळे नेमकी सभा भाजपची का कॉंग्रेसची असा सवाल उपस्थित केला जात आहे. यामुळे चर्चेला एकच उधाण आले आणि सोशल मीडियावर तुफान फोटो व्हायरल झाले.

    राहुल गांधी यांच्या खुर्च्यावर लावण्यात आलेल्या स्टीकरवर आमचा लढा 138 वर्षांचा असं लिहिण्यात आलं आहे. तसेच यावर स्कॅन करण्यासाठी स्कॅनर आहे. काही दिवसांपूर्वी खासदार राहुल यांची नागपूर येथे सभा झाली. त्याचं कंत्राटदराने या खुर्च्या पुरविल्या आहेत असे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यावरील पोस्टर न काढता नजरचूकीने या खुर्च्या पाठवण्यात आल्या आहेत. पण या घटनेमुळे मात्र चर्चांना उधाण आले आहे.