आगामी काळात देशमुखांच्या नेतृत्वाखाली माण-खटावचे प्रश्न मार्गी लावणार : अजित पवार

आगामी काळात देशमुखांच्या नेतृत्वाखाली माण-खटावचे प्रश्न मार्गी लावणार असे अजित पवार यांनी सांगितले.

    म्हसवड : देशातील शेतकऱ्यांचे लाडके नेते असलेल्या शरद पवार यांची नेहमीच माण-खटावच्या जनतेने पाठराखण केली आहे. त्यामुळे येथील जनतेशी आमचे जिव्हाळ्याचे नाते असून, हेच नाते अधिक दृढ करण्यासाठी माण – खटावच्या हजारो हेक्टर क्षेत्रात हरितक्रांती घडवण्यासाठीच महाविकास आघाडीच्या माध्यमातून टेंभु योजनेतून अडीच टीएमसी पाणी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, अर्थसंकल्पीय वर्ष संपण्यापुर्वी हे पाणी माण – खटावच्या शिवारात फिरताना दिसेल. तर उर्वरीत माणच्या सर्व गावांनाही पाणी देण्यासाठी सर्वेक्षणाचे काम जलद गतीने सुरु आहे.

    फक्त राष्ट्रवादी पक्षच माण-खटावचे प्रश्न मार्गी लावत असून, येथील प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रभाकर देशमुख हे सतत मंत्रालयात हेलपाटे मारताना दिसतात. त्यामुळे यापुढे देशमुख सांगतील. ते प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, अशी स्पष्टोक्ती अजित पवार यांनी दिली.

    टेंभु योजनेतुन माण – खटावमधील ५७ गावांचा समावेश केल्याबद्दल वरकुटे – मलवडी येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आयोजित कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते.

    यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, प्रभाकर देशमुख, आमदार दिपक चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, प्रा. कविता म्हेत्रे, सुभाष शिंदे, संदीप मांडवे, अभय जगताप, अनुराधा देशमुख, नंदकुमार मोरे,वडुज नगराध्यक्षा मनिषा काळे दहिवडी नगराध्यक्ष सागर पोळ, बाळासाहेब सावंत, सरपंच बाळासाहेब जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी पुढे बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, माण – खटावमध्ये आमच्या विचाराचा लोकप्रतिनिधी नाही तरीही येथील जनता आमची आहे. या जनतेची गेली अनेक वर्षाची पाण्याची मागणी प्राधान्याने सोडवण्याचे‌ काम राज्यातील आमच्या सरकारने हाती घेतले असून, यासाठी या तालुक्यांना वरदान ठरणार्या टेंभु योजनेचा अतिरिक्त पाण्याचा कोटा वाढवुन ते वाढीव अडीच टीएमसी पाणी या तालुक्याला देण्याचा धाडसी निर्णय आम्ही घेतला आहे.