सेंद्रिय खतापासून अडीच गुंठ्यामध्ये तब्बल 300 किलो मिरचीचे उत्पादन; अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्याचा प्रेरणादायी प्रयोग

    अलिबाग : मध्यंतरी गुजरात येथे झालेल्या कृषीच्या कार्यक्रमात नैसर्गिक शेती हेच शेती व्यवसायाचे भवितव्य आहे, त्यादृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.

    दरम्यान त्यानंतर काही राज्यांनी नैसर्गिक शेतीचे नियोजन आणि कार्यपध्दतीही ठरवलेली आहे. ठरविल्याप्रमाणे शेतकरी चांगले उत्पन्न देखील घेत आहेत. अलिबागच्या सचिन बैकर या तरुण शेतकऱ्याने केलेला सेंद्रिय शेतीचा प्रयोग प्रेरणादायी ठरत आहे.

    अडीच गुंठ्यातच त्याने मिरचीचे उत्पादन घेतले असले तरी यामध्ये रासायनिक खताचा वापर नाही तर लागवड ते काढणीपर्यंत सेंद्रीय पध्दतीचा अवलंब केला आहे. हा प्रयोग त्याने फक्त अडीच गुंठ्यातच यशस्वी करुन दाखवला आहे.

    दरम्यान उत्पादन वाढीसाठी शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात. मात्र, सचिनने सेंद्रीय खताचा निर्मिती केली आणि याचाच डोस मिरचीला दिला आहे. सेंद्रिय खत त्याने कुक्कुटपालन करताना पक्षी मरतात, यांच्यापासून बनवला. हे मृत पक्षी, खराब अंडी, शेण, गोमूत्र आणि गूळ याचे मिश्रण करुन एका ड्रममध्ये साठवून ठेवले. अवघ्या काही दिवसांमध्ये सेंद्रीय खताची निर्मिती झाली. चार-पाच दिवसांच्या फरकाने मिरचीसाठी बनवलेल्या वाफ्यामध्ये पाटाच्या पाण्याद्वारे सेंद्रीय खत सोडण्यात आले. अशाप्रकारे अडीच गुंठ्यामध्ये 300 किलो मिरचीचे उत्पादन झाले आहे.