महापालिकेकडून कचरा कुड्यांचाच ‘कचरा’

उद्योगनगरीत दररोज निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे योग्य रितीने व्यवस्थापन होण्यासाठी मोशी कचरा डेपो येथे सुमारे ८१ एकर इतकी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. महापालिका हद्दीत प्रतिदिन सुमारे १ हजार ते ११०० मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होते.

    • शहरातील ३७१ कचरा कुंड्यांचे उच्चाटन

    पिंपरी: पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने कचराकुंडी मुक्त शहर उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी शहरातील सार्वजनिक ठिकाणच्या ३७१ कुंड्या उचलल्या जात असून करोडो रुपयांच्या कुंड्यांचाच कचरा केला जात आहे. कचराकुंड्या रातोरात हटविल्यामुळे नागरिक कुंडीच्या ठिकाणी, रस्त्यावर इतस्त: कचरा टाकत आहेत. ‘चरा चरात कचरा’मुळे स्वच्छ आणि सुंदर शहर अस्वच्छ बनत आहे.

    उद्योगनगरीत दररोज निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे योग्य रितीने व्यवस्थापन होण्यासाठी मोशी कचरा डेपो येथे सुमारे ८१ एकर इतकी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. महापालिका हद्दीत प्रतिदिन सुमारे १ हजार ते ११०० मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होते. शहरातून वेगवेगळ्या क्षेत्रातून घनकचरा मोशी कचरा डेपो परिसरात आणला जातो. महापालिकेकडून दररोज कचरा संकलन करुन मोशी डेपोत नेला जातो. महापालिकेने शहराच्या विविध भागात ३७१ कचरा कुंड्या ठेवल्या होत्या. त्यामुळे नागरिकांची सोय होत होती. मात्र, कचराकुंडी विरहीत शहरासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सर्वच कुंड्यांचे उच्चाटन केले जात आहे. या कुंड्या क्षेत्रीय कार्यालय आणि नेहरुनगर येथील मध्यवर्ती भांडारात ठेवल्या जात आहेत. करोडो रुपये खर्चुन विकत घेतलेल्या कुंड्याचा एकाप्रकारे ‘कचरा’च होणार आहे.

    महापालिकेने अचानक धोरण ठरविल्यानंतर एका रात्रीत कचराकुंड्या गायब झाल्या. त्यामुळे नागरिक, व्यावसायिक – व्यापारी यांची गैरसोय झाली. घरोघरी कचरा संकलन करणाऱ्या गाडीची वेळ निश्चित नसते, कधी सकाळी तर कधी दुपारी गाडी कचरा नेण्यासाठी येते, त्यामुळे नोकरदार, कामावर जाणाऱ्या नागरिकांना कचरा समस्या भेडसावते, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणच्या कचरा कुंड्यांंमुळे नागरिक याच ठिकाणी कचरा टाकत होते. परिणामी, नागरिकांकडून कुंड्यांच्या ठिकाणी, रस्त्यावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे कचरा समस्या मार्गी लागण्याऐवजी बिकट होत आहे.

    महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे म्हणाले, शहर कचराकुंडी मुक्त करायचे आहे. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणच्या ३७१ कचरा कुंड्या उचलल्या जात आहेत. बैठ्या घरांमध्ये राहणाऱ्या आणि नोकरीवर जाणाऱ्या नागरिकांची कचरा टाकण्यात गैरसोय होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यासाठी कचरा गाडीची वेळ, मार्ग बदलण्याचे नियोजन केले जात आहे. कचरा कुंडीच्या ठिकाणी कचरा टाकू नये यासाठी कर्मचारी नेमला जाईल किंवा सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील. कचरा कुंड्यांचे उच्चाटन केल्यामुळे शहराबाहेरील कचरा शहरात टाकणाऱ्यास अटकाव येईल.