Janasagar flowed in Satara in support of Udayanaraje; Filed with a grand display of power; Presence of Chief Minister Shinde along with Fadnavis,

  सातारा : महायुतीचे साताऱ्याचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांचा अर्ज गुरुवारी भव्य शक्ती प्रदर्शनाने दाखल करण्यात आला. उदयनराजे यांना पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्ह्याच्या सहा विधानसभा मतदारसंघाचे समर्थक मोठ्या प्रमाणावर साताऱ्यात जमले होते. यावेळी गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये पाच हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला. उदयनराजे यांच्या समर्थनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्वतः साताऱ्यात दाखल झाले होते.
  उदयनराजे यांचे शक्ती प्रदर्शन
  महायुतीच्या वतीने साताऱ्याची जागा भाजपच्या पदरात पडल्यानंतर बाराव्या यादीमध्ये भाजपच्या केंद्रीय सुकाणू समितीने उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब केले. उदयनराजे यांच्या शक्ती प्रदर्शनाचे सूक्ष्म नियोजन उदयनराजे मित्र समूह आणि सातारा विकास आघाडीच्या वतीने करण्यात आले होते. जलमंदिर ते गांधी मैदान यादरम्यान बैलगाडीमधून उदयनराजे यांची रॅली काढण्यात आली. शुक्रवार पेठेतील मरीआई माता मंदिराच्या कोपऱ्यावर या बैलगाडीमध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीनंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या बैलगाडीवर स्वार झाले.
  शिवेंद्रसिंहराजे, उदयनराजे यांच्यासह अतुल भोसले हेसुद्धा बैलगाडीत स्वार
  शिवेंद्रसिंहराजे, उदयनराजे यांच्यासह अतुल भोसले हेसुद्धा बैलगाडीत स्वार झाले आणि जलमंदिरपासून ते गांधी मैदानापर्यंत ‘उदयनराजे आगे बढो हम तुम्हारे साथ है, आले रे आले राजे आले’ अशा घोषणांनी जलमंदिरचा परिसर दणाणला. गांधी मैदानावर आल्यानंतर भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी उदयनराजे भोसले यांचे औक्षण केले. यावेळी भाजपचे कमळ चिन्ह असलेला फुलांनी सजवलेल्या रथ तयार करण्यात आला होता. या रथावर उदयनराजे शिवेंद्रसिंहराजे लोकसभा प्रभारी अतुल भोसले भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम शिंदे समर्थक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई इत्यादी यावेळी उपस्थित होते.
  गांधी मैदानावर भर तळपत्या उन्हामध्ये हजारो समर्थकांचा जथ्था
  रॅली गांधी मैदानावरून राजपथाच्या दिशेने मार्गस्थ झाली त्यावेळी तरुणाईने जोरदार जल्लोष केला तत्पूर्वी युवकांची बाईक रॅली काढण्यात आली होती. गांधी मैदानावर भर तळपत्या उन्हामध्ये हजारो समर्थकांचा जथा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने चालू लागला रॅली मोती चौक, देवी चौक, कमानी हौद तेथून शेटे चौकातून कर्मवीर पथावरून पोवई नाक्याकडे मार्गस्थ झाली. सातारा शहरात ठिकठिकाणी उदयनराजे यांच्या रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत झाले. दरम्यान दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे तिघेही एकाच हेलिकॉप्टरमधून पोलीस कवायत मैदानावर दाखल झाले. तेथून लगेच तिघेही पोवई नाक्यावर आले तेव्हा तेथे रॅलीचे रूपांतर अभिवादन कार्यक्रमात झाले.
  छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण
  सर्व मान्यवरांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तेथून रॅली बांधकाम भवन येथे सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी ही रॅली तेथेच थांबवली. खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजित दादा पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, लोकसभा प्रभारी अतुल भोसले ही ठराविक मंडळी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले. दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी उदयनराजे भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सुमारे दोन तास झालेल्या या रॅलीला प्रचंड जनसागर लोटला होता रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे महायुतीच्या नेत्यांचा उत्साह दुणावला आहे.
  जनमानसात त्यांची खूप लोकप्रियता
  उदयनराजे यांचा स्वभाव संघर्ष करण्याचा आहे. ते सतत लोकांच्या हक्कासाठी धडपडत असतात याचा अभिमान आहे. जनमानसात त्यांची खूप लोकप्रियता आहे म्हणूनच विरोधक त्यांना विरोध करतात पण आईसाहेबांनी त्यांना बांधिलकीचा संस्कार दिला आहे. या रॅलीत साताऱ्यातील नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आले. उदयनराजे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातच नव्हे तर देशभरात त्यांचा दबदबा आहे याचा खूप अभिमान आहे. – श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले.