पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन

महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे संस्थेचे आधारस्तंभ व माजी केंद्रीय कृषिमंत्री पद्मविभूषण शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शारदा व्याख्यानमाला तसेच संस्था पातळीवर विविध आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

  पुणे : महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे संस्थेचे आधारस्तंभ व माजी केंद्रीय कृषिमंत्री पद्मविभूषण आदरणीय शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शारदा व्याख्यानमाला तसेच संस्था पातळीवर विविध आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

  याविषयी अधिक माहिती देताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य अॅड. संदीप कदम म्हणाले की, आदरणीय पवार साहेब हे साहित्य, कला, क्रीडा, इतिहास, राजकारण व संस्कृती यांची जाण असलेले एक चतुरस्र व्यक्तिमत्व असुन आजच्या युवकांना प्रेरक ठरणाऱ्या या गुणसंपन्नतेची जडणघडण होणे आवश्यक आहे. त्यामुळेच साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संस्थेशी संलग्नित सर्व महाविद्यालयांमधून विद्यार्थी व शिक्षकांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम व स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट करत विद्यार्थी व शिक्षकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

  सद्यस्थितीला कोविड – १९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला बघता सर्व उपक्रम अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ऑनलाइन माध्यमातून घेतली जाणार आहेत. त्याअनुषंगाने १२ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन शारदा व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. १२ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्या शुभ हस्ते या व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार असून महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) चे मुख्य मार्गदर्शक मा. विवेक सावंत हे ‘तंत्रशिक्षण व उद्योजकता’ या विषयावर पहिले पुष्प गुंफणार आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित इंटेलिजंट कोटीटेन्ट सिक्युरिटी सिस्टिम संस्थेचे संचालक हरॉल्फ डी कोस्टा हे ‘सायबर गुन्हे – जागृती’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफणार असून ‘लोकशिक्षक संत गाडगे बाबा’ या विषयावर प्रसिद्ध साहित्यिक वि. दा. पिंगळे हे तिसऱ्या पुष्पामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

  याप्रसंगी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त अनिल गुंजाळ हे देखील चौथ्या पुष्पामध्ये ‘शिक्षण आणि शिक्षकांची समाजातील भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. पाचव्या पुष्पामध्ये सुप्रसिद्ध साहित्यिक मिलिंद जोशी हे ‘वाचू आनंदे’ या विषयावर वैचारिक खाद्यांची मेजवानी देणार आहेत. सहाव्या व अंतिम पुष्पामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर हे ‘नवीन शैक्षणिक धोरण २०२०’ वर प्रकाश टाकणार असून समारोप समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.

  त्याचप्रमाणे विद्यार्थी व अध्यापकांसाठी विज्ञान प्रदर्शन, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, ई – पोस्टर, ई – कन्टेन्ट व पीपीटी, रोबोटिक्स मॉडेल मेकिंग, शुभेच्छा पत्र लेखन, काव्यलेखन, प्रश्नमंजुषा, अभिनय स्पर्धा, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य वाढण्यासाठी ‘PDEA शरद वक्तृत स्पर्धेचे’ पारंपरिक व व्यावसायीक या दोन गटामध्ये आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः सद्यस्थितीमध्ये शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयीन जीवनापासूनच व्यायामाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने सायकलिंग व सूर्यनमस्कार यासारख्या अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व स्पर्धा व उपक्रमांमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थी व शिक्षक सहभागी होणार असून स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत.

  या संपूर्ण स्पर्धा व उपक्रमाच्या यशस्वितेसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व शाखाप्रमुख परिश्रम घेत आहेत.