मराठवाड्यात रब्बीच्या पेरण्या संथ गतीनेच, काय आहेत कारणे ? : जाणून घ्या सविस्तर

रब्बीच्या पेरण्या महिन्याभराने लांबणीवर पडलेल्या आहेत. असे असतानाही पेरणी कामांना अद्यापही वेग आलेला नाही. मराठवाड्यात सर्वात आगोदर चाढ्यावर मूठ ठेवली जाते पण यंदा आतापर्यंत केवळ 9 टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत.

    लातूर : रब्बीच्या पेरण्या महिन्याभराने लांबणीवर पडलेल्या आहेत. असे असतानाही पेरणी कामांना अद्यापही वेग आलेला नाही. मराठवाड्यात सर्वात आगोदर चाढ्यावर मूठ ठेवली जाते पण यंदा आतापर्यंत केवळ 9 टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत.

    यामध्ये बीड, जालना, औरंगाबाद जिल्हे हे मागे आहेत. रब्बी हंगामात दरवर्षी ज्वारीवर अधिकचा भर असतो यंदा मात्र, परस्थिती बदलली असून हरभरा आणि गव्हाकडे शेतकऱ्यांचा कल आहे. खरिपात झालेल्या अधिकच्या पावसाचा परिणाम हा आता रब्बी हंगामावरही जाणवू लागलेला आहे.

    दरम्यान दरवर्षी ऑक्टोंबर महिन्याच्या अंतिम टप्प्यातच रब्बीच्या पेरण्या ह्या संपलेल्या असतात. यंदा मात्र, अधिकच्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या असून ज्या भागात सर्वात रब्बीची पिके बहरात येत असतात त्याच मराठवाड्यात अद्यापपर्यंत शेतकऱ्यांनी चाढ्यावरच मूठ ठेवलेली नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम खरिपासह रब्बी हंगामावरही दिसून येत आहे.

    पेरण्या लांबण्याचे काय आहे कारण?

    मराठवाड्यात ऑक्टोंबर अखेरपर्यंत पावसाने उघडीपच दिलेली नव्हती. त्यामुळे बीड, लातूर, जालना, औरंगाबाद जिल्ह्यातील शेतजमिनी ह्या चिभडलेल्याच होत्या. त्यानंतर जमिनीची मशागत आणि प्रत्यक्ष पेरणीला सुरवात करताना झालेला अवकाळी पाऊस यामुळे पेरणी करण्यास विलंब झाला आहे. शिवाय अधिकच्या पावसामुळे शेतजमिनी ह्या आवळून आल्या होत्या. त्यामुळे अशा अवस्थेत पेरणी केली तर उगवण होते की नाही हा प्रश्न आहे. त्यामुळे योग्य मशागत आणि वेळप्रसंगी शेत जमिन ओलवूनच पेरणी करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिल्याने उशीर झाला आहे.