राहुल गांधींचा घणाघात; 22 तारखेला अयोध्येत ‘राजकीय नरेंद्र मोदी इव्हेंट’

    अयोध्येमध्ये येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन (Ayodhya Ram Mandir Inauguration) सोहळ्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेकांनी हा भाजपचा (BJP) राजकीय कार्यक्रम असल्याचे सांगून कार्यक्रमावर नाराजी व्यक्त केली आहे. मंदिर निर्माण पूर्ण झाले नसले तरी प्राण प्रतिष्ठा करत असल्यामुळे शंकराचार्यांनी (Shankaracharya) सोहळ्याला उपस्थिती लावण्यास नकार दिला आहे. दरम्यान, कॉंग्रेसने (Congress) देखील अयोध्येच्या राम मंदिर उद्घाटनाला त्यांच्या पक्षातील कोणीही उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले. यावर आता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

    राहुल गांधी यांची सध्या ‘भारत जोडो न्याय यात्रा’ (Bharat Jodo Nyay Yatra) चालू आहे. आज या यात्रेने नागालँडमध्ये प्रवेश केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. यावेळी राम मंदिर उद्घाटनाला कॉंग्रेस सहभागी का होणार नाही या प्रश्नाचे उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, “22 जानेवारी रोजी अयोध्येत होणारा कार्यक्रम म्हणजे राजकीय इव्हेंट आहे. आम्ही (काँग्रेस) सर्वच धर्मांबरोबर आहोत. पण मला धर्माचा फायदा उचलायचा नाही. मला त्यात रस नाही. मला माझ्या धर्माचा शर्ट परिधान करून फिरण्याची आवश्यकता नाही. ज्यांना तिकडे जायचं आहे ते जाऊ शकतात. परंतु, आम्ही 22 जानेवारीला अयोध्येत जाणार नाही. आमच्या पक्षाकडून कोणीही अयोध्येला जाणार नाही.” अशी भूमिका राहुल गांधी य़ांनी मांडली.

    पुढे ते म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाला ‘राजकीय नरेंद्र मोदी इव्हेंट’ बनवलं आहे. हा संघ आणि भाजपाचा कार्यक्रम आहे. त्यामुळेच काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, ते या कार्यक्रमाला जाणार नाहीत. आम्ही सर्व धर्मांना मानतो आणि त्यांचा सन्मान करतो. हिंदू धर्माच्या सर्वात मोठ्या नेतृत्वकर्त्यांनीदेखील (शंकराचार्य) या कार्यक्रमाबाबत त्यांचं मत मांडलं आहे. त्यांनीदेखील या कार्यक्रमाला राजकीय इव्हेंट म्हटलं आहे. मी त्यांच्या मताचाही आदर करतो.” अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.