‘फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी पुणे’च्या संचालकपदी राहुल महाडिक बिनविरोध

राहुल महाडिक हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. तर वाळवा पंचायत समितीचे विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत. सर्वात कमी वयाचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून सांगली जिल्ह्यात यापूर्वी नावलौकिक मिळवला होता.

    इस्लामपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी पुणेच्या संचालकपदी सलग दुसऱ्यांदा युवानेते राहुल महाडिक यांची बिनविरोध निवड झाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पतसंस्था गटातून नुकतेच ते विजयी होत संचालक झाले आहेत.

    येथील वनश्री नानासाहेब महाडिक मल्टिस्टेट अर्बन को आॕप क्रेडिट सोसायटीचे ते संस्थापक आहेत. फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसा.लि.पुणे या संस्थेच्या सभासदांची सन २०२१ ते २०२६ कालावधीसाठी संस्थेच्या संचालक मंडळ निवडीसाठीची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. सभेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

    अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत २१ जणांनी अर्ज दाखल केले. चार जणांनी अर्ज मागे घेतले. संस्थेच्या पोटनियमानुसार सभासदांनी निवडून देण्याच्या एकूण संचालक मंडळाची संख्या १७ असल्याने व १७ उमेदवारांचे अर्ज शिल्लक असल्याने बिनविरोध संचालक मंडळ म्हणून घोषित करण्यात आले. या संचालक मंडळात राहुल महाडिक यांना संधी मिळाली आहे.

    राहुल महाडिक हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. तर वाळवा पंचायत समितीचे विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत. सर्वात कमी वयाचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून सांगली जिल्ह्यात यापूर्वी नावलौकिक मिळवला होता. तरुणांचे संघटन कौशल्य उत्कृष्ट असल्याने त्यांना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.