वसतिगृहातील ते खडतर आयुष्य जगलो म्हणूनच हे जीवन अनुभवता आलं; महिला बालकल्याण आयुक्त राहुल मोरे यांनी उलगडवला जीवनप्रवास

कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यातील ६५० मुले अनाथ झाली असून यापैकी चारशे मुलांच्या खात्यावर प्रत्येकी पाच लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बारामती तालुक्यातील अंजनगाव सारख्या खेडेगावातून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात राहत असताना सकाळच्या जेवणावेळी ताटातील चतकोर चपाती शिल्लक ठेवून ती रात्रीच्या जेवणावेळी खायचो, असं संघर्षमय आयुष्य जगलो म्हणूनच हे चांगले दिवस अनुभवता आले, असे प्रतिपादन राज्याचे महिला व बालकल्याण आयुक्त राहुल मोरे यांनी करून आपला जीवनप्रवास उलगडवला. आपल्या कठोर परिश्रमाची दखल घेऊन वरिष्ठांनी या पदावर काम करण्याची संधी मला दिल्याने मिळालेल्या अधिकाराचा वापर अनाथ बालकांसह सर्वसामान्यांसाठी आपण करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

    राहुल मोरे यांची राज्याच्या महिला बालकल्याण आयुक्त पदावर निवड झाल्यामुळे बारामती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह याठिकाणी त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सत्काराला उत्तर देताना मोरे बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, माजी नगराध्यक्ष ैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैै कैलास चव्‍हाण, राष्ट्रवादीचे गटनेते सचिन सातव, बारामती बाजार समितीचे माजी सभापती दादासाहेब मोरे, बाळासाहेब परकाळे, वसतिगृहाचे अध्यक्ष प्रा. दयानंद मिसाळ, सदस्य व बारामती दूध संघाचे माजी अध्यक्ष ॲड आर. ए जगताप, नगरसेवक नवनाथ बल्लाळ, गणेश सोनवणे, मयुरी शिंदे, अनिता जगताप, आरती शेंडगे आदिंसह इतर मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी राहुल मोरे म्हणाले, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी शिक्षण घेतले. बारामती शहरातील या वसतिगृहात राहून शिक्षण घेत असताना दोन वेळचे जेवण मिळत होते. सकाळी जेवण करत असताना ताटातील चतकोर चपाती शिल्लक ठेवून ती पेटीमध्ये ठेवायचो, कारण जास्त भूक लागणारी मुलं, ती चपाती ठेवत नव्हते. रात्रीच्या जेवणावळी शिल्लक राहिलेली चपाती मी खात होतो. या वसतिगृहाच्या परिसरात आम्ही भाजीपाला लावायचो. या ठिकाणची इमारत व्यवस्थित नव्हती. पाण्याच्या टाकीजवळ थंड पाण्याने सकाळी लवकर आंघोळ करत होतो. या वस्तीगृहातील तत्कालीन दिवंगत पंचनयन शिंदे सर यांची शिस्त आजही आठवते. कधी शाळा बुडवली, तर शिंदे सरांची पाचही बोटे गालावर उमटत होती. जन्मानंतर माझे आजी -आजोबा, त्यानंतर आई -वडील व काका – काकी हे पहिले तीन गुरु होते. त्यानंतर प्राथमिक शाळेतील गुरु होते. सुरूवतीला प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेतल्यामुळे आजचे हे दिवस अनुभवायला मिळाले. राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाचा उपायुक्त म्हणून काम करत असताना माझ्या कामाची दखल घेऊन प्रधान सचिवांनी राज्याच्या आयुक्तपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. राज्याचे २०२१-२२ पासूनचे १० वर्षाचे महिला व बाल संगोपनाचे धोरण ठरवण्याची महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर आहे, ही माझ्यासाठी, अंजनगाव साठी व या वसतिगृहासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. राज्यातील ७० महत्वाच्या आयएएस अधिकाऱ्यांसोबत काम करण्याची संधी मला यानिमित्ताने मिळाली असून महापुरुषांनी दाखविलेल्या कठोर परिश्रमाच्या मार्गावर चालल्यानेच हे यश मिळवता आले.

    आजच्या या सत्कारामध्ये माझे गुरूजन, वडीलधारे व मित्र यांचा वाटा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी बारामतीच्या संस्कारात वाढलेल्या राहुल मोरे यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. कैलास चव्‍हाण यांनी मोरे यांच्या कार्याचे कौतुक केले. प्रास्ताविक सावली अनाथालयाचे महेश अहिवळे यांनी केले. परिचय आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे यांनी करून दिला. आभार प्रा रमेश मोरे यांनी मानले. सूत्रसंचालन धनपाल भोसले यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय मोरे, प्रशांत सोनवणे, संजय मोरे, सचिन साबळे, सुभाष नारखेडे,तानाजी पाथरकर, अरविंद बगाडे, शंकर गव्हाळे, सचिन देवकुळे आदींनी परिश्रम घेतले.

    कोरोनामुळे ६५० अनाथ मुलांसाठी प्रत्येकी पाच लाख रुपये 

    कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यातील ६५० मुले अनाथ झाली असून यापैकी चारशे मुलांच्या खात्यावर प्रत्येकी पाच लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित मुलांच्या खात्यावर येत्या काही दिवसातच सदर रक्कम वर्ग होणार आहे. संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली यासाठी शीघ्र कृती दलाच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. कोरोनामुळे आई किंवा वडील असे एक पालक गमाविलेल्या २० हजार मुलांना प्रतिमहिना अकराशे रुपये बालसंगोपन योजनेच्या माध्यमातून दिले जात आहेत. तरी या अगोदरच्या ४० हजार अनाथ बालकांना ही रक्कम दरमहा दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. विधवा महिलांसाठी विविध ९० योजनांची माहिती असलेली पुस्तिका २ ते ३ महिन्यात प्रकाशित करण्यात येणार असल्याचे महिला व बाल कल्याण आयुक्त राहुल मोरे यांनी यावेळी सांगितले.