Raj Thackeray
Raj Thackeray

Maratha Reservation : मनोज जरांगेंना भेटून सांगितलं होतं असं कोणतंच आरक्षण मिळणार नाही. मनोज जरांगेंचा बोलवता धनी कोण? निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जातीय तणाव निर्माण कोण करतंय? असे राज ठाकरे म्हणाले.

  Raj Thackeray On Manaoj Jarange : मनोज जरांगे यांना भेटून सांगितलं होतं असं कोणतंच आरक्षण (Maratha Reservation) कधीही मिळणार नाही. मुळात त्यांच्या मागे कोण आहे, कोण बोलायला सांगत आहेत, निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर असे जातीय तणाव होत आहेत, हे लवकरच समोर येईल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) म्हणाले. मुंबईमध्ये राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी अनेक विषयावर आपली मत मांडली.  सरकारवरही त्यांनी टीकेची तोफ डागली. त्याशिवाय अजित पवार आणि शरद पवार यांच्यावरही हल्लाबोल केला.
  शरद पवार यांच्यावर हल्लाबोल, पुन्हा एकदा डागली तोफ –
  जात ही गोष्ट अनेकांना प्रिय असते, स्वतःच्या जातीबद्दल अभिमान असणे हे होत होते महाराष्ट्रात, पण दुसऱ्याच्या जाती बद्दल द्वेष निर्माण करणे हे राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात सुरू झाले. यांच्या स्वार्थापायी आपण महाराष्ट्र खड्ड्यात घालतोय,माझ्यासाठी माणूस महत्त्वाचा, मी जात पात मानत नाही, त्या माणसाला महत्त्व देतो, असे म्हणत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
  भाजपावर टीका
  मध्य प्रदेशमध्ये भाजपने मतदारांना मोफत आयोध्यावारी घडवण्याचे अश्वासन दिले. त्यावरुन राज ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली. राज ठाकरे म्हणाले की, टूर अॅण्ड ट्रॅव्हल्स नावाचे नवीन खाते उघडणार आहेत असे वाटतेय, इतके वर्ष जे काम केले त्यावर निवडणुका लढवायला हव्यात.’
  पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, राज ठाकरेंचा सरकारला इशारा
  हवा आणि ध्वनिप्रदूषणामुळे कोर्टाने दिवाळीत फटाके वाजण्यासंदर्भात निर्देश दिले होते. त्यावर राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. आता फटाके कधी वाजवायचे, सण कसे साजरे करायचे हे पण कोर्ट ठरवणार का? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मराठी पाट्या संदर्भात आम्ही मुद्दा घेतला तेव्हा व्यापारी कोर्टात गेले, हे जातात कसे ? पण सरकारमधून काही हालचाली होत नाही. कदाचित आम्हालाच हात पाय हलवावे लागतील, असा इशाराच राज ठाकरेंनी एकप्रकारे दिलाय.
  निवडणुकीची तयारी सुरु – राज ठाकरे –
  पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका का होतात? हे मला आज पर्यंत कळले नाही, तिथे उमेदवार नावाखाली सही किंवा अंगठा असे लिहिले असते, मग या निवडणुका का घेतातच कशाला? पण त्याची सुरुवात झाली आहे, आम्ही तयारी करतो आहे, सिनेटसाठी देखील तयारी करतो आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.